अंधश्रद्धेपोटी अजूनही होतेय मांडूळ, कासवाची तस्करी!
By admin | Published: June 5, 2016 03:40 AM2016-06-05T03:40:09+5:302016-06-05T03:40:09+5:30
पैशांचा पाऊस पाडायचा असेल, तर पावणेतीन किलोचे मांडूळ व एकवीस नखांचे कासव आणा, लागेल ती किंमत मिळेल, अशा झटपट पैशाच्या हव्यासापोटी आज कितीतरी लोक मांडूळ, कासव यांच्या मागे
- नीलेश काण्णव, घोडेगाव
पैशांचा पाऊस पाडायचा असेल, तर पावणेतीन किलोचे मांडूळ व एकवीस नखांचे कासव आणा, लागेल ती किंमत मिळेल, अशा झटपट पैशाच्या हव्यासापोटी आज कितीतरी लोक मांडूळ, कासव यांच्या मागे लागली आहेत. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभाग ‘वन्य प्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी व अवैध वापर’ थांबवण्याचा संदेश देत आहे. मात्र अजुनही अंधश्रद्धेपोटी सुरू असलेले हे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
खेड, नारायणगाव येथे गुन्हे दाखल झाल्याने याचे प्रमाण कमी झाले. मात्र अजुनही लोक मांडूळ, कासवासाठी फिरताना दिसतात. मांडूळ, कासवाप्रमाणेच पाच किलोचे अजगर, काळी हळद, देवघरातील काशाचा नंदी, काळा खिळा अशा वस्तू मांत्रिक प्रयोगासाठी वापरतात व त्याला मोठी मागणी आहे. वन्यप्राण्यांविषयी अनेक अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहेत. पावणेतीन किलोच्या पुढील मांडुळावर अमावस्येच्या रात्री मांत्रिकाने प्रयोग केल्यावर पैशाचा पाऊस पडतो. एकवीस नखे असलेले कासव जमिनीखाली दडलेले पैसे, सोने सापडून देते अथवा कासव जवळ ठेवल तर लकी असते, कासव घरात किंवा आॅफिसमध्ये ठेवल्यास भरभराट होते. या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून अनेक लोक या प्राण्यांना पकडण्यासाठी फिरतात. काही श्रीमंत व्यक्तींची नावे घेत त्याने असे प्रयोग केल्यानेच श्रीमंत झाला, अशा अनेक गोष्टी मांत्रिक रंगवून सांगतो. या मांत्रिकाच्या सांगण्यावरून व भ्रामक कल्पनांमधून झटपट पैसे मिळवण्याच्या नादात लोक या प्राण्यांच्या मागे लागतात.
मी हा नाद पूर्णपणे सोडलेला
आहे
नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना एका व्यक्तीने सांगितले, की मी आतापर्यंत पन्नास हजार रुपये घातले. परंतु, एकदाही पैशाचा पाऊस पडलेला दिसला नाही. मांडुळे पाहिली, त्याच्या व्यवहारांमध्ये सहभागी झालो. मात्र प्रत्यक्षात कोटी रुपयांनाच काय तर हजारामध्येही कोणी मांडूळ विकत घेताना मी पाहिले नाही. या नादात मी वर्ष घालविले. त्यामुळे माझे घराकडे, व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. त्यातून अजूनच अडचणी वाढल्या. आज मी हा नाद पूर्णपणे सोडून दिला आहे. या नादाने पळापळ करणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो, की हे सर्व खोटे आहे. याच्या मागे लागू नका.
मांडुळाच्या अंगातील द्रव औषधासाठी उपयोगी पडते. औषध कंपन्या द्रव काढून घेतात व लाखो रुपयांना ती औषधे विकतात, म्हणून मांडुळाला मागणी आहे.
यावर्षीचा पर्यावरणदिन वन्य प्राण्यांचा, वस्तूंचा होत असलेला गैरवापर व शिकार थांबविण्यासाठी जनजागृती करणे यासाठी साजरा होत आहे. मांडूळ, कासव यांचा अंधश्रद्धेपोटी होत असलेला गैरवापर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत वनविभाग अतिशय जागरूक व कठोर असून, असे प्रकार थांबवले जातील. लोकांनीही सोपे व झटपट पैसे मिळविण्याच्या नादात याच्या मागे लागू नये.- सुनील लिमये,
मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग
हा प्रकार नव्याने आलेला नाही. मागील अनेक वर्षांपासून भारतातच नव्हे, तर जगात चालू आहेत. पावसाळ्यात सुगरणीची शिकार केल्याने नशीब फळफळते म्हणून कर्नाटकात लोक सुगरणी मारतात. याचे परिणाम निसर्गावर वेगवेगळ्या प्रकारे होत राहतात, अशा परंपरा खंडित करण्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे.
- माधव गाडगीळ, शास्त्रज्ञ