सासवड रुग्णालयातच डेंग्यूची लागण

By admin | Published: November 5, 2014 05:41 AM2014-11-05T05:41:42+5:302014-11-05T05:41:42+5:30

जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, सासवड ग्रामीण रुग्णालयातच डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

Dangue infection in Saswad Hospital | सासवड रुग्णालयातच डेंग्यूची लागण

सासवड रुग्णालयातच डेंग्यूची लागण

Next

जेजुरी : जिल्ह्यात डेंग्यूचा विळखा घट्ट होत असून, सासवड ग्रामीण रुग्णालयातच डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. येथील दोन वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी एका परिचारिकेवर आजही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामीण रुग्णालयच डेंग्यूच्या प्रसाराचे ठिकाण असल्याने सासवड नगरपालिका या रुग्णालयाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल करणार का, अशीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांची संख्या ही वाढतच आहे. त्या मानाने पुरंदर तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले नाहीत, अशी माहिती जेजुरी व सासवड ग्रामीण रुग्णालयाकडूनच मिळाली आहे. सासवड ग्रामीण रुग्णालयात माहिती घेत असताना, शहर व ग्रामीण भागातून रुग्ण आढळले नसल्याची माहिती देण्यात आली. मात्र, त्याचवेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आय. बी. पाटील, डॉ. ऊर्मिला चिकणे हे दोन वैद्यकीय अधिकारी आणि ए. के. भालेराव, प्रगती नाळे या दोन परिचारिकांना डेंग्यूची लागण झाली होती. विशेष म्हणजे, आजही एका परिचारिकेवर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे सासवड व जेजुरी ग्रामीण रुग्णालय डेंग्यूचे रुग्ण आढळले नसल्याची माहिती देत आहेत, जे आढळले ते बाहेर गावाहून आलेले होते, असे सांगत आहेत. तर, सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्येच गेल्या दोन महिन्यांत २५ डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार केल्याची माहिती मिळते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातूनही वैद्यकीय अधिकारी माहिती देत नाहीत. थेट नाव घेऊनच त्या रुग्णाविषयी विचारलेच, तर तो डेंग्यूचा रुग्ण नाही, डेंग्यूसदृष्य रुग्ण असल्याचे तितक्याच सफाईने सांगून टाकत आहेत. एकट्या बेलसर आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गावातून गेल्या दोन महिन्यांत अधिकृत ८ रुग्ण आढळले असले, तरी ही ती संख्या जास्तच आहे. साकुर्डे गावातील भोंगळेमळा येथेच ६ रुग्ण असल्याची माहिती तेथील ग्रामपंचायत सदस्य संपत जगताप यांनी दिली.
या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक बी. के. परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, तालुका वैद्यकीय अधिकारीही नॉट रिचेबल होते. मात्र, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाला योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दखल न घेतल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे सांगितले.

Web Title: Dangue infection in Saswad Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.