गर्द हिरवाई, मेघांची गर्दी अन् सोबतीला डोंगररांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:14+5:302021-06-27T04:09:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गर्द हिरवाई, आसमंतात मेघांनी केलेली गर्दी, सोबतीला डोंगररांगा, हळूच येणारी पावसाची सर, बोगद्यात दाटणारा ...

Dark green, crowded with clouds and mountain range | गर्द हिरवाई, मेघांची गर्दी अन् सोबतीला डोंगररांगा

गर्द हिरवाई, मेघांची गर्दी अन् सोबतीला डोंगररांगा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गर्द हिरवाई, आसमंतात मेघांनी केलेली गर्दी, सोबतीला डोंगररांगा, हळूच येणारी पावसाची सर, बोगद्यात दाटणारा अंधार अन् पुन्हा येणारी प्रकाशाची तिरीप अशा नयनरम्य वातावरणात मुंबई-पुणे दरम्यान व्हिस्टाडोमने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे हे वर्णनच ‘व्हिस्टाडोम’च्या प्रवासाची अनुभूती देते.

शनिवारपासून मध्य रेल्वेने डेक्कन एक्स्प्रेसला ‘व्हिस्टाडोम’चा डबा जोडून प्रवाशांना एका वेगळ्या प्रवासाची अनुभूती दिली. या कोचचा पहिला दिवस असल्याने डब्याला सजविण्यात आले होते. सीटच्या बाजूला मोठ्या काचा बसविण्यात आल्या आहेत. डब्यांच्या छतावरही काचा असल्याने बच्चे कंपनीसह मोठ्या प्रवाशांनी प्रवासाचा आनंद लुटला. कुणी पळती झाडे पाहिली तर कुणी घाटातील सौंदर्य पाहिलं. प्रत्येकजण आपापल्या परीने या प्रवासाचा मनमुराद आनंद लुटताना दिसला. निसर्गाचे ऐश्वर्य पाहत गाडी पुणे स्थानकावर सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी दाखल झाली. यावेळी स्टेशन डायरेक्टर सुरेशचंद्र जैन, स्थानक व्यवस्थापक अजय कुमार सिन्हा, प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा उपस्थित होते.

पहिल्या दिवशी मुंबई -पुणे ४४ प्रवाशांनी प्रवास केला. तर पुणे-मुंबई २८ प्रवाशांचे आरक्षण होते. यावेळी डब्यात कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून रेल्वेने मुंबईहूनच मेकॅनिक विभागाचा स्टाफ डब्यात ठेवला होता. दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी गाडी पुणे स्थानकावरून निघाली. मुंबई-मडगाव जनशताब्दी व मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसचा रेक लिंक करण्यात आला आहे.

Web Title: Dark green, crowded with clouds and mountain range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.