प्रकाशच्या आयुष्याची अंधकारमय वाटचाल
By admin | Published: January 17, 2017 02:10 AM2017-01-17T02:10:39+5:302017-01-17T02:10:39+5:30
रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले
वाकड : रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समोर आले आणि आता या सामान्य कुटुंबाच्या डोळ्यांपुढे गडद अंधार पसरला आहे. त्याच्या जन्मदात्या आईने एक किडनी देत त्याला पुनर्जन्म देण्याचा निश्चय केला आहे; मात्र आर्थिक पाठबळामुळे गेल्या तीन महिन्यांपासून तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकला आहे. माणमधील प्रकाश अण्णा बोबडे या २५ वर्षीय तरुणाची ही व्यथा आहे.
घरातील मोठा आणि एकुलता एक मुलगा. हे कुटुंब मूळ बीडचे. संसाराची जबाबदारी स्वीकारत दोन पैसे कमविण्याच्या आशेने प्रकाश बिऱ्हाड घेऊन पुण्यातील माणला आला. काही दिवस इकडे-तिकडे काम केल्यानंतर तो रिक्षा चालवू लागला. सर्व काही आलबेल असतानाच दोन वर्षांपूर्वीची दिवाळी त्याच्यापुढे काळाकुट्ट अंधार घेऊन आली. प्रकाशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली.
धुणी-भांड्याचे काम करणारी आई, बूट पॉलिश करणारे वडील आणि पत्नी हे सर्व जण दररोज प्रकाशसाठी देवाकडे प्रार्थना करतात. आता काही तरी चमत्कार होऊ दे अन् उपचारासाठी पैसे मिळू दे अशी त्यांची देवाकडे मागणी असते. मात्र अद्यापतरी प्रकाशाला असा कोणी देवमाणूस भेटला ना एकही चमत्कार झाला. आजतागायत प्रकाशला दोन दिवसांतून एकदा, तर महिन्याकाठी १६ डायलिसिस करावे लागतात. एका डायलिसिसचा खर्च सोळाशे रुपये आहे. महिन्यातील १६ डायलिसिसपैकी ८ तो राजीव गांधी निराधार योजनेद्वारे करतो. मात्र उर्वरित आठ तो स्वत: कमाविलेल्या पैशातून करतो. आता केवळ जगण्यासाठीच त्याला काम करावे लागत आहे. उपचार घेऊन येताच घरी न जाता थेट रिक्षावर जाऊन तो धंदा करतो व उपचारासाठी पैसे कमावतो. मदतीची गरज आहे. त्याला मदत मिळाली तर त्याच्या जीवनात पुन्हा प्रकाश येईल, तो पुन्हा नव्याने उभारी घेईल. (वार्ताहर)
>आईचे प्रेम, एक किडनी देण्याची तयारी
घरातील कर्ता पुरुष, घराचा एकमेव आधार असलेल्या प्रकाशला नियतीने जीवन-मरणाच्या वाटेवर उभे करीत नामोहरम केले असले, तरी जन्मदात्या आईने आपल्या जिवाची पर्वा न करता पोटच्या गोळ्यासाठी त्याला पुनर्जन्म देत एक किडनी देण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार आई आणि प्रकाश या दोघांच्याही सर्व चाचण्या डॉक्टरांच्या पथकाने दिल्लीला करवून घेतल्याने आईची किडनी जुळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.