पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 07:44 PM2022-07-10T19:44:37+5:302022-07-10T19:57:25+5:30
यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय
धायरी : यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय खडकवासला बिलाल मस्जिदच्या वतीने घेण्यात आला. आषाढी एकादशी दिवशी ईदचं नमाज पठण करून, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ११ जुलैला कुर्बानी देण्याचा निर्णय मुस्लिम समाजानी घेतला आहे. यातून ऐकतेचा संदेश पोहचवत असल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.
मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचं परिसरात कौतुक होत आहे. धार्मिक कारणावरुन काही समाज कंटकांकडून द्वेष निर्माण करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हवेली उपविभागातील संवेदनशील गावांमध्ये पोलीसांनी मिटिंग घेऊन मंदिर व मस्जिद च्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी शांततेत नमाज अदा केली व आषाढी एकादशी असल्याने आज बकऱ्याची कुर्बानी देणार नसल्याचे खडकवासला येथील बिलाल मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष नूर सय्यद यांनी सांगितले.
परिसरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्येही दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मंदिर व मस्जिद परिसरात हवेली उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नमाज पठण करताना मौलानांनी सर्व धर्म समभाव या भावनेतून मुस्लिम समाजाला एक वेगळा संदेश दिला की, आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद सण असल्याने सर्व मुस्लिम बांधवांनी मांसाहाराचे कार्यक्रम रद्द करावे, हा संदेश दिला. बकरी ईद निमित्त बिलाल मस्जिद खडकवासला या ठिकाणी दोन वेळा नमाज पठण करण्यात आले. मौलाना रफिक सुतार यांनी यबाबत मार्गदर्शन केले. यावेळी खडकवासला बिलाल मस्जिदचे अध्यक्ष नूरभाई सय्यद, जब्बारभाई शेख, आसिफ सोहेल, भाई शेख, तनवीर शेख, आदी उपस्थित होते.