महाभारतातील व्यक्तित्वाचे दर्शन - शापित अश्वत्थामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:54+5:302021-05-23T04:09:54+5:30
संदर्भ प्रकाशनाने प्रकाशित आणि अनंत जोशी लिखित शापित अश्वत्थामा हे पुस्तक केवळ अश्वत्थामाच्या व्यक्तिरेखेची माहिती देत नाही तर कुरुसम्राट ...
संदर्भ प्रकाशनाने प्रकाशित आणि अनंत जोशी लिखित शापित अश्वत्थामा हे पुस्तक केवळ अश्वत्थामाच्या व्यक्तिरेखेची माहिती देत नाही तर कुरुसम्राट महाराज शंतनू, त्यांचे पुत्र भीष्म, भीष्माचे सावत्र भाऊ विचित्रवीर्य आणि त्यांच्या पत्नी आंबिका व आंबालिका यांच्यापासून झालेले पुत्र धृतराष्ट्र, पांडू व दासीपुत्र विदूर यापासून कौरव-पांडवापर्यंतचा इतिहासही संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे. त्यानंतर भीष्म, द्रोणाचार्य या विशेष व्यक्तीरेखांचा परिचर करून अश्वत्थामापर्यंत लेखन प्रवास पोचतो. अश्वत्थामाने दुर्योधनाच्या मैत्रीखातर द्रौपदीपुत्रांची केलेली हत्या, अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या पोटात असलेल्या गर्भाचा नाश करण्याची त्याची वल्गना आणि त्यानंतर श्रीकृष्णाने त्याला तीन हजार वर्षे जीवंत राहण्याचा (चिरंजीव) दिलेला शाप इथपर्यंतची माहिती वाचताना महाभारताची कथा डोळ्यासमोर उभी राहते तेच या पुस्तकाचे मोठे यश आहे.
मृत्यू, मृत्यूचे वरदान आणि शाप याचे विश्लेषण करताना लेखकाने ‘दि मॅन फ्रॅाम द् अर्थ’ या चित्रपटातील नायकात अश्वत्थामाच असल्याचे सांगतात व त्या चित्रपटाचाही उहापोह सदर पुस्तकात रोचक पध्दतीने करतात. ८६व्या वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहाने केलेले हे लेखन म्हणजे कौतुकाचा विषय आहे. यापूर्वीही लेखकाने पंचकन्या (अहल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी) यावर पुस्तक लिहिले आहे.