दरडी काढण्याचे काम संथगतीने
By admin | Published: July 28, 2015 12:42 AM2015-07-28T00:42:05+5:302015-07-28T00:42:05+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे सुरू करण्यात आलेले काम संथ गतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील धोकादायक दरडी काढण्याचे सुरू करण्यात आलेले काम संथ गतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. काम सुरू असल्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविली जात असल्याने होत असलेली वाहतूककोंडी सोमवारीही कायम होती. दरम्यान, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ दरडी कोसळल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याचे काम २४ जुलैपासून सुरू केले आहे. हे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असला, तरी काम संथ गतीने सुरू आहे. आंध्र प्रदेशातील मेटाफेरी या कंपनीचे १४ जणांचे विशेष पथक धोकादायक दरडी व सैल झालेले दगड काढण्याचे काम करत आहे. त्यांना स्पेन येथील चार तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. शिवाय, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. आयआरबीचे अनेक कर्मचारी व यंत्रणा या कामात गुंतली आहे. मात्र, कामाची प्रगती संथ आहे.
दरडी काढण्याचे काम सुरू असताना एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात येत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने गेले चार दिवस प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. याचा फटका मुंबई व पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसत आहे. शिवाय, स्थानिकांनाही वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने सदर काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. काम सुरू असताना उडालेला दगड लागून आयआरबीचा एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून, जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामाच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडत असल्याने काम करताना अडचणी येत आहेत. शिवाय, पावसामुळे तयार होणारे धुकेही कामात अडथळा आणत आहे.
जुन्या दिवसांची आठवण
-पूर्वी मुंबई व पुण्याला जाणारी वाहने बोर घाटातील अवघड टप्पे पार करत मार्गस्थ होत होती. बोर घाटात एखादे वाहन बंद पडले, तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. एक्सप्रेस वेची निर्मिती झाल्यानंतर मात्र तुरळक वाहनेच जुन्या मार्गाने जात होती. गेल्या चार दिवसांपासून लोणावळेकर,खोपोलीकर जुने दिवस आठवू लागले आहेत. बोर घाटाचा अवघड टप्पा पार करताना अनेक वाहने बंद पडत असल्याने वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या फिटर्सना चांगले दिवस आले आहेत. शिवाय, मके, चिक्की, काकडी, वडापाव, पाण्याच्या बाटल्या व अन्य वस्तूंची विक्री करताना अनेक तरुण जुन्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण १५ वर्षे मागे गेल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ व्यक्त करताना दिसत आहेत.