इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 01:07 AM2018-09-29T01:07:33+5:302018-09-29T01:19:46+5:30
आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आळंदी - येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तर, येथील रुग्णालयात डासांनी चावलेल्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. या मुळे इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. इंद्रायणी नदीचे चौंडी घाटालगत परिसरातील गवतांसह झाडे झुडपांच्या साम्राज्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे.
चिखली, कुदळवाडी, कुरुळी, चिंबळी परिसरातील रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.
आळंदीत नदी परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यात इंद्रायणीनगर, गोपाळपूर, इंद्रायणी नदीलगतच्या दुतर्फा नागरिकांसह भाविकांना या डासांच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना डास चावल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदी नगर परिषद प्रशासनाने कुजलेली जलपर्णी तसेच नदीकिनाऱ्यालगत दुतर्फा वाढलेले गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत कुजलेली व साचलेली जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यासह जंतुनाशक फवारणी, नदीचे परिसरात धुरीकरण करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.
डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम
डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी डेंग्यूच्या आजाराला कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस देवकाते, डॉ. बी. एन. दडस, आरोग्य सहायक व्ही. एन. घुले, एन. एस. ठोके, बी. डी. नातू, एन. एम. लकडे, आरोग्य सेवक एस. एस. गोरे, एस. एस. उपाध्ये, विजय जगताप, जे. एम. दळवी तसेच आशा कार्यकर्त्या या सर्व आरोग्य विभागाने गावात कंटेनर सर्व्हे, पाणी पुरवठा नियंत्रण, ओटी टेस्ट, ताप रुग्ण तपासणी केली. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी पाणी साठवणारी भांडी घासून पुसून कोरडी व रिकामी करावीत, पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, अशा सूचना गावकºयांना केल्या .