डीएसके दांपत्याला १५ मार्चपर्यंत कोठडी, कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:11 AM2018-03-03T01:11:13+5:302018-03-03T01:11:13+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ६८) आणि त्याच्या पत्नी हेमंती (वय ५९, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ६८) आणि त्याच्या पत्नी हेमंती (वय ५९, दोघेही, रा. सेनापती बापट रस्ता) यांना विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
डीएसकेंची तब्येत चांगली असल्याचा अहवाल ससून रुग्णालय मेडिकल बोर्डाने दिला. त्यानुसार त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ही मुदत गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुरुवारी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यावर त्यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे. आरोपींचे वकील श्रीकांत शिवदे यांनी पोलीस कोठडीत असताना डीएसके यांना आवश्यक वस्तूदेखील पुरवल्या गेल्या नाहीत. त्यांची तब्येत बिघडली असताना थंड पाण्याने अंघोळ करण्यास पोलिसांनी भाग पाडल्याची माहिती न्यायालयाला दिली.
दरम्यान, न्यायालयातच डीएसकेंना मला मरण्यापूर्वी ठेवीदारांचे पैसे परत करायचे आहेत, असे म्हणताना अश्रू अनावर झाले. मात्र, न्यायालयात उपस्थित असणाºया तक्रारदारांनी डीएसके हे नाटक करत असून, या नाटकी रडण्यावर न्यायालयाने विश्वास ठेवू नये. त्यांच्यावर दया दाखवत असल्यास आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील विचार करण्यात यावा, अशी विनवणी केली. यानंतर न्यायालयाने गुंतवणूकदारांचे हित महत्त्वाचे आहे, त्यादृष्टीनेही न्यायालय भूमिका बजावेल, असा आत्मविश्वास व ग्वाही त्यांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला संघर्ष समितीच्या महिलांनी डीएसकेविरोधात घोषणा दिल्या.