अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:03 AM2023-07-10T09:03:57+5:302023-07-10T09:04:21+5:30
कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे अशी ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरून नेली
पुणे : शहरात दिवसा तसेच रात्रीच्या घरफोड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. त्याचवेळी छोट्या-मोठ्या चाेऱ्या होताना दिसतात. ओंकारेश्वर घाट येथे दशक्रियाविधी असलेल्या इमारतीमधील कपाटात असून, काय असणार; पण चोरट्यांनी तेही फोडून त्यातून दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्य चोरून नेले. याबाबत पौराेहित्य अथर्व प्रशांत मोघे (वय २०, रा. सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील दशक्रिया विधी घाटावरील महापालिकेच्या इमारतीत ७ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ८ जुलै सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा दशक्रिया विधीचे पौराहित्य करण्याचा व्यवसाय आहे. दशक्रिया घाट इमारतीमधील कपाटात त्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते. चोरट्याने इमारतीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे अशी ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरून नेली. पोलिस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.