चोरांनी दशक्रिया विधीचे साहित्यही सोडले नाही, ओंकारेश्वर घाटावर चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:53 AM2021-04-27T11:53:35+5:302021-04-27T12:15:27+5:30
साहित्यात तांबे, चांदी, पितळे आदी भांड्यांचा समावेश
पुणे: आज सकाळी ओंकारेश्वर घाटावरील हॉलमध्ये असणाऱ्या तांबे, चांदी, पितळ आदी भांडयाची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घाटावरील गुरुजी प्रशांत मोघे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. हॉलचे शटर उचकटून तेथे चांदी, तांबा व पितळाचे सुमारे ४० तांबे,४० ताम्हण, पळी भांड्याचे २० सेट, पराती पातेले, चांदीचा तांब्या,3 भांडी,2 ताम्हण चांदीचे आणि एक पळी, येवढे साहित्य चोरीला गेल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत.
ओंकारेश्वर घाटावर नागरिक दशक्रिया आणि अन्य विधीसाठी येत असतात. त्यासाठी या साहित्याची गरज असते. इथे एक हॉल असल्याने सर्व साहित्य त्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवले जाते. सकाळी सर्व विधी करून झाल्यावर हॉल पूर्णपणे बंद करून गुरुजी जातात. त्यामुळे कोणालाही त्याठिकाणी लक्ष देण्याची गरज नसते. तरीही एका वर्षात तीन वेळा चोरी झाल्याचे गुरुजींनी सांगितले आहे. सुरुवातीला हॉलचे पत्रे उचकटून भांडी पळवून नेली होती. आता शटर उचकटून भांडी चोरण्यात आली आहेत.
गुरुजी मोघे म्हणाले की, घाटाच्या शेजारी शनिवार पेठ पोलीस चौकी आहे. आतापर्यंत एक वर्षात तीन वेळा चोरी होऊनही पोलिस दखल घेत नाहीत. आजही सकाळी चोरी झाल्यावर आम्ही चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी फक्त हवालदार येउन फेरफटका मारून गेले. आमचे अधिकारी आल्यावर बघू असे आम्हाला सांगितले. पण कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेतली नाही. तरी ह्या चोरीचा तपास करावा. तेथे सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.