जम्बोमधील रुग्णांच्या ‘रियल टाईम’ अपडेटसाठी डॅशबोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 08:46 PM2020-09-14T20:46:44+5:302020-09-14T21:21:14+5:30

तब्येतीतील सुधारणा आणि बिघाडाची माहिती मोबाईलवर

Dashboard for ‘real time’ updates of patients in Jumbo | जम्बोमधील रुग्णांच्या ‘रियल टाईम’ अपडेटसाठी डॅशबोर्ड

जम्बोमधील रुग्णांच्या ‘रियल टाईम’ अपडेटसाठी डॅशबोर्ड

Next
ठळक मुद्देजम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारतेय

पुणे : जम्बो रुग्णालयातील रुग्णांच्या तब्येतीमधील सुधार अथवा बिघाडाची माहिती आता अधिकारी व डॉक्टरांना ‘रियल टाईम’ मिळू शकणार आहे. त्यासाठी पालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली असून रुग्णांच्या बेड क्रमांकानुसार संबंधित रुग्णाची सद्यस्थिती समजू शकणार आहे. बेडला जोडलेल्या व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणांवरील माहिती थेट या यंत्रणेद्वारे समजू शकणार आहे.सोमवारपासून या डॅशबोर्डच्या सुविधेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
जम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारु लागली आहे. वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उपचारांमध्ये गती आली आहे. रुग्णांची संख्याही वाढविण्यात आली आहे. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. यासोबतच रुग्णांची माहिती मिळत रहावी, त्यांच्या उपचारांची माहिती आणि सद्यस्थितीची माहिती मिळावी याकरिता डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर खाटेच्या क्रमांकानुसार त्यावरील रुग्णाचे हृदयाचे ठोके, आॅक्सिजन, व्हेंटीलेटरवर दर्शविली जाणारी माहिती एकाच वेळी पाहता येणे शक्य झाले आहे. ज्या रुग्णांची तब्येत अत्यवस्थ असेल त्यांच्यापुढे लाल रंगाची पट्टी येते. त्यामुळे जे डॉक्टर शिफ्ट बदलल्यानंतर येतील त्यांना सर्वात आधी या रुग्णांची तपासणी करणे यामुळे शक्य होणार आहे.  पालिकेने सुरु केलेला हा डॅशबोर्ड डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसाठी आहे.
 .....


महापौरांच्या हस्ते लोकार्पण
रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीचे औपचारिक उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अगरवाल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
=====
या माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे रुग्णांना दाखल करून घेतल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जात आहेत. याठिकाणी कमांड रुम तयार केली आहे. आयसीयू, व इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अपडेट केला जाणार आहे.
======
जम्बो कोविड रुग्णालयातील व्हिडिओ कॉल सुविधेमुळे रुग्णांशी थेट संवाद साधून विचारपूस करता येत असल्याने नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांसोबत संवाद साधला आहे.  या सुविधेमुळे नागरिकांच्या मनातील शंका, भीती दूर होत असून रुग्णांची ख्याली खुशाली समजत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Web Title: Dashboard for ‘real time’ updates of patients in Jumbo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.