‘त्या’च्या कृतज्ञतेच्या जाणिवेची ‘दशक्रिया’, बैलाच्या मृत्यूनंतर केले सर्व धार्मिक विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 08:44 PM2018-04-11T20:44:44+5:302018-04-11T20:44:44+5:30
घाटावर बैलाच्या पिंडाला ‘काकस्पर्श’ झाला आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला... मालकाच्या या भावनिक गुंतावळीने ‘नाग्या’चा आत्माही गहिवरला असेल...
कोरेगाव भीमा : ‘तो’ त्यांच्या शेतात राबायचा... औत ओढायचा... शेतशिवार हिरवंगार करण्यात आणि घरातील धान्याच्या कणग्या भरण्यात त्याच्या कष्टाचा मोठा वाटा... कुटुंबातील सदस्य असलेल्या ‘त्या’चा मृत्यू झाला... दु:खात लोटलेल्या कुटुंबाने कृतज्ञतेच्या भावनेतून दशक्रिया विधी केला... माणसाच्या मृत्यूपश्चात केले जाणारे सर्व धार्मिक विधी केले... घाटावर पिंडाला ‘काकस्पर्श’ झाला आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला... मालकाच्या या भावनिक गुंतावळीने ‘नाग्या’चा आत्माही गहिवरला असेल...
प्राणी आणि मानवामधील भावनिक बंधाच्या अनेक कथा आजवर समोर आल्या आहेत. कृषीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये बैलाला सन्मानाचे स्थान आहे. बैलपोळा साजरा करुन बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. ‘भूतदया’ हा अंगभूत सद्गुण असायला हवा असे संस्कार बालवयात केले जातात. मात्र, कृतीमधून फार थोडके लोकच प्राण्यांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसतात. शेतक-याच्या कुटुंबात मात्र, बैलांना कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक दिली जाते.
कोरेगाव भीमा येथील राजाराम काळुराम गव्हाणे, विश्वास काळूराम गव्हाणे या बंधूंनी त्यांच्या ‘नाग्या’ बैलाबाबत असलेला भावनिक बंध आपल्या अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या दोघांनाही बैलगाड्यांचा छंद आहे. बैलांचा मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. या दोघांनी दहा वर्षांपुर्वी लोणीकंद येथील पांजरपोळ संस्थेमधून नाग्या बैल आणला. त्याला उत्तम प्रतीचा आहार दिला. तसेच घाटामध्ये पळण्यायोग्य तयार केले.
नाग्याने शिरुर, हवेलीसह सहा तालुक्यांमधील बैलगाडा शर्यतींमध्ये लौकिक मिळवला. त्याची ओळख ‘फायनल सम्राट’ अशीच झाली होती. त्याच्यावर हे दोघेही बंधू जिवापाड प्रेम करीत होते. त्याचा 5 एप्रिल रोजी मृत्यू झाला. गव्हाणे कुटुंबियांना याचे अतोनात दु:ख झाले. त्याच्यावर यथोचित अंत्यसंस्कार करण्यात आले. दहा दिवस दुखावटा पाळून त्याचा दशक्रिया विधी करण्यात आला. मृत्यूपश्चात केले जाणारे सर्व धार्मिक विधी करण्यात आले. गव्हाणे कुटुंबियांची ही प्राण्यांप्रती असलेली कणव पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
केवळ दशक्रिया विधी करुनच हे कुटुंब थांबले नाही तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवचनही ठेवण्यात आले होते. या दशक्रिया विधीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, नातलग, मित्रमंडळी, बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी पेटा या संस्थेने बैलगाडा शर्यतीवर लावण्यात आलेली केस मागे घेऊन सरकारने देखील बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात अशी एकजुटीने करण्यात आली. गव्हाणे कुटुंबियांनी बैलाबाबत दाखविलेली संवेदनशीलता आणि प्रेम पाहून अनेकजण हेलावून गेले होते.