दस्तूर, डेक्कन अ अंतिम फेरीत
By admin | Published: April 27, 2017 05:09 AM2017-04-27T05:09:20+5:302017-04-27T05:09:20+5:30
सरदार दस्तूर, डेक्कन जिमखाना अ यांनी मुलींच्या गटात बालाजी बास्केटबॉल अॅकॅडमी व डेक्कन जिमखाना अ यांनी मुलांच्या गटात
पुणे : सरदार दस्तूर, डेक्कन जिमखाना अ यांनी मुलींच्या गटात बालाजी बास्केटबॉल अॅकॅडमी व डेक्कन जिमखाना अ यांनी मुलांच्या गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून इंदिरा जोशी स्मृती १८ वर्षांखालील जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने कोथरूड येथील मिलेनियम नॅशनल स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत साक्षी कोठावळे (१२), श्रुती शेरीगर (१०) आणि ज्ञानेश्वरी कोंढरे (८) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सरदार दस्तूर स्कूलने डेक्कन जिमखाना ब संघाला ५९-२९ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पराभूत संघाकडून अनुजा बलदोटा व वैष्णवी भरकुंट चांगल्या खेळल्या.
दुसऱ्या उपांत्य लढतीत डेक्कन जिमखाना अ संघाने सीएनएसए संघाला ३८-१५ गुणांनी पराभूत केले. विजयी संघाकडून दुर्गा धर्माधिकारीने १७ तर ईशा घारपुरेने १२ गुण नोंदवले. पराभूत सीएनएसए संघाकडून शर्वरी पाठकने ५ व साक्षी नाईकने ४ गुण केले.
मुलांच्या पहिल्या उपांत्य लढतीत डेक्कन जिमखाना अ संघाने स्काय लॉँज अ संघाला ५३-२५ गुणांनी नमवले. डेक्कन अ कडून नागेश सुतारने १४, सार्थक भालेरावने १३ गुण केले. पराभूत संघाकडून दिव्यांक शुक्लाने १४ तर अली राजाने ७ गुण नोंदवले. दुसऱ्या उपांत्य लढतीत बालाजी बास्केटबॉल अॅकॅडमीने अक्षय भोसले अॅकॅडमीला ४१-३७ गुणांनी पराभूत केले.