'डीमार्ट'ची बनावट वेबसाईट बनवून चोरला जातोय डेटा; फेक लिंकवर क्लिक कराल तर फसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:23 AM2023-08-15T11:23:48+5:302023-08-15T11:24:12+5:30
बटनावर क्लिक केल्यानंतर डी-मार्ट इंडिपेन्डेन्स डे साठी बोनस देत आहे....
पुणे : 'डी-मार्ट'च्या नावे बनावट वेबसाईट तयार करून सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. सोमवारी (दि. १४) शहरात अनेकांच्या मोबाइलवर डी-मार्टकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात ऑफर मिळत असल्याची लिंक फिरत होती. या लिंकवर क्लिक केल्यास ‘अभिनंदन!’ तुम्हाला गिफ्ट जिंकण्याची संधी आहे. ‘कृपया सुरू ठेवण्यासाठी क्लेम गिफ्ट बटण क्लिक करा’ असा मेसेज आला. बटनावर क्लिक केल्यानंतर डी-मार्ट इंडिपेन्डेन्स डे साठी बोनस देत आहे.
काही प्रश्नांची उत्तरे दिली तर तुम्हाला ६ हजार रुपये मिळेल असा मेसेज दिसत होता. त्यामध्ये तुम्हाला डी मार्ट माहीत आहे का? तुमचे वय किती? तुम्हाला डी मार्टबद्दल काय वाटते? आणि तुम्ही स्त्री किंवा पुरुष? या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. त्याची उत्तरे दिल्यावर 'तुम्हाला ६ हजार रुपये मिळाले आहेत' असा मेसेज डिस्प्ले होतो. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक अट दिली जाते, ती अशी की तुम्हाला ही लिंक ५ ग्रुप्स आणि २० मित्रांना पाठवावी लागेल.
'लोकमत'ने या लिंकबाबत डी-मार्टच्या व्यवस्थापन अधिकाऱ्याशी संपर्क केला असता ही लिंक फेक असून, तुमचा डेटा चोरण्यासाठी अशी लालच दिली जाते. अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये आणि ती पुढे फॉरवर्डही करू नये. तसेच कुणी असे करत असल्यास त्याला हे फेक असल्याची माहिती द्यावी असे डी-मार्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.