महाविद्यालय सुरू करण्यास ‘तारीख पे तारीख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:51+5:302021-01-25T04:13:51+5:30
पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये ...
पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. सध्या उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये व वसतिगृहांमधील क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेत आहे. या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
राज्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे महाविद्यालयीन तरूणाई अस्वस्थ आहे. उच्च शिक्षण विभाग महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही उदासिन आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सुध्दा ‘तारीख पे तारीख’ देत आहेत. रविवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी महाविद्यालय व वसतीगृहातील क्वारंटाईन सेंटरबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.त्यामुळे उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस अभ्यास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू केले होते. मात्र, शाळांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून या शाळा सुरू केल्या. पुणे शहरात सुमारे दीड महिन्यांपूर्वी सर्व क्वारंटाईन सेंटर बंद केले आहेत. त्याचप्रमाणे सुमारे दहा दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेवून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय २० जानेवारीपर्यंत जाहीर केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले होते. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी बंद झालेल्या क्वारंटाईन सेंटरचा अभ्यास करण्यास उच्च शिक्षण विभाग आणखी किती दिवस घेणार ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
---
महाविद्यालये सुरू करण्यासाठी किती टक्के विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांना बोलवावे याबाबतची नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घेऊ.
- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री