दहावी अन् बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, परिपत्रक जारी
By महेश गलांडे | Published: February 16, 2021 11:22 PM2021-02-16T23:22:04+5:302021-02-16T23:22:54+5:30
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीच्या तारखा शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
पुणे - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात पुन्हा विचारविनिमय होत आहे. तसेच, मुंबईतील लोकल सेवाही कार्यरत असावी का नाही, याबाबतही पुढील आठवड्यात निर्णय होईल. त्यामुळे, संभाव्य परीक्षांबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत होत. त्याच पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रकर प्रसिद्ध केलंय.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीच्या तारखा शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२१ पासून हे नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. करोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. कोरोनामुळे यंदा देशातील शिक्षण विभागाचं गणित कोलमडलं असून शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं.
इयत्ता १० वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाईल. तर निकाल ऑगस्ट २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता १२ वीची परीक्षा केव्हा?
इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ दरम्यान घेतली जाईळ. तर निकाल जुलै २०२१ च्या अखेरीस जाहीर केला जाईल.