तरुणींशी डेटिंगचा माेह ज्येष्ठाला पडला महागात; डेटिंग ॲपद्वारे १७ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:46 AM2022-11-12T11:46:45+5:302022-11-12T11:48:04+5:30

श्रेया नावाच्या महिलेविराेधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Dating with young women cost the senior; 17 lakhs scam through dating app | तरुणींशी डेटिंगचा माेह ज्येष्ठाला पडला महागात; डेटिंग ॲपद्वारे १७ लाखांचा गंडा

तरुणींशी डेटिंगचा माेह ज्येष्ठाला पडला महागात; डेटिंग ॲपद्वारे १७ लाखांचा गंडा

Next

पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी १७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी येथील ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रेया नावाच्या महिलेविराेधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. ते बँकेत अधिकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली होती. गतवर्षी डिसेंबर महिन्यात श्रेया नावाच्या एका तरुणीने फिर्यादींच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. तेव्हा तिने तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखविले होते, तसेच तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का, अशी विचारणा करीत त्यांच्या मोबाइल क्रमांकावर विविध तरुणींची छायाचित्रे पाठविली होती.

फिर्यादींनी सुरुवातीला त्यांनी ऑनलाइन पद्धतीने आरोपी श्रेयाच्या बँक खात्यात तीन हजार रुपये पाठविले. त्यानंतर, आणखी पैशांची मागणी करण्यात आली. श्रेयाने दिलेल्या बँक खात्यात त्यांनी वेळोेवेळी पैसे पाठविले. दरम्यान, तरुणीशी मैत्री न झाल्याने त्यांनी विचारणा केली, तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. श्रेयाच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी पुन्हा संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारादाराला आमिष दाखवून वेळोवेळी १७ लाख १० हजार रुपये उकळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करीत आहेत.

Web Title: Dating with young women cost the senior; 17 lakhs scam through dating app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.