धक्कादायक! बेरोजगारीमुळे जीवरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:11 PM2022-01-10T22:11:31+5:302022-01-10T22:15:47+5:30
Pune News : पुशिलकर हे बालगंधर्व रंगमंदिराशेजारील नांदे जलतरण तलाव येथे जीवरक्षक म्हणून काम करीत होते.
पुणे : कोरोनामुळे जलतरण तलाव २ वर्षांपासून बंद राहिल्यामुळे बेरोजगारीमुळे एका जीवरक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्ता शंकर पुशिलकर (वय ४१, रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा) असे या जीवरक्षकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुशिलकर हे बालगंधर्व रंगमंदिराशेजारील नांदे जलतरण तलाव येथे जीवरक्षक म्हणून काम करीत होते. कोरोनामुळे मार्च २०२० पासून जलतरण तलाव बंद आहे. त्यामुळे त्यांची नोकरी गेली होती. त्यावेळी ते शिवाजीनगर परिसरात रहात होते. नोकरी गेल्यानंतर त्यांनी मुंढवा येथील जलतरण तलाव येथे काही दिवस काम केले. पण, ते ही काम गेले होते.
काही महिन्यांपूर्वीच ते केशवनगर परिसरात आईसमवेत राहण्यास आले होते. काम मिळत नसल्यामुळे ते नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आईने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार पाहिल्यानंतर नातेवाईकांना कळविले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुंढवा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.