दत्तात्रय गाडे हा सराईत, वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून लुबाडायचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:59 IST2025-02-27T10:59:13+5:302025-02-27T10:59:40+5:30
शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत

दत्तात्रय गाडे हा सराईत, वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून लुबाडायचा
शिरूर : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार करणार संशयित दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकीत बसवून त्यांना लुबाडायचा.
शिरूर व स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये दत्तात्रय गाडे याने कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. या कारमधून तो पुणे-अहिल्यानगर या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, याच महामार्गावर अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलेला लिफ्ट देत असे. त्यांना घरून जेवणाचा डबा घ्यायचा आहे किंवा जवळच्या मार्गाने जाऊ, असे सांगून महामार्गाजवळ आडमार्गे निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्या महिलेला तेथेच सोडून तो पलायन करत असे. अशाप्रकारे त्याचे उद्योग सुरू असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले होते तर सुमारे १२ तोळे सोने जप्त केले होते.
गुणाट ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गाडे याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. गावात त्याचे पक्क्या बांधकामातील पत्र्याचे छत असलेले घर आहे तर वडिलोपर्जित तीन एकर शेतजमीन आहे. आई-वडील शेतात काम करतात. त्याला एक भाऊ असून, पत्नी, लहान मुले आहेत. असे असले तरी पहिल्यापासून तो काहीही कामधंदा न करता टारगट मुलांसोबत उनाडक्या करत फिरतो. यातूनच झटपट पैसे कमावण्याच्या मोहात त्याने हे उद्योग केल्याचे समोर आले आहे.
मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय गाडे हा एका मोठ्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्या पुढाऱ्यासोबत त्याचे अनेक फोटो साेशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच गाडे हा गुणाट गावच्या तंटामुक्त समितीत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीत उभा राहिला होता. परंतु, यात त्याचा पराभव झाला.
भोगली शिक्षा
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात दत्तात्रय गाडेने लुटमार केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर जबरी लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातच तीन-चार वर्षांपूर्वी त्याला पाच-सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. तसेच तालुक्यातील शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत. इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट फिरत होता.