घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून दत्तभक्तांचा समाज शुद्धीकरीता जपयज्ञ, २ हजार महिला आणि पुरुषांचा एकत्रित सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 02:28 PM2017-11-26T14:28:04+5:302017-11-26T14:28:21+5:30
पुणे : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर... च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील तब्बल २ हजार दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले.
पुणे : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर... च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील तब्बल २ हजार दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. केवळ पुण्यातच नव्हे, तर यंदा सांगलीतील दत्तमंदिरासह राजस्थान, गुजरात यांसारखी राज्ये व अमेरिकेतील विविध शहरांतून दत्तभक्तांनी ई-सत्संगाच्या माध्यमातून या उपक्रमात सहभाग घेतला होता.
दत्तजयंतीच्या निमित्ताने कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), नगरसेवक हेमंत रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त अॅड. एन. डी. पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते.
दत्तमंदिर ट्रस्टचे यंदा १२० वे वर्ष असून प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे १२१ वे जयंती वर्ष आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक रमेश रावेतकर व सहकारी यांनी सादर केलेल्या दत्तगीतांनी झाली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या उच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तर घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
बाबा महाराज तराणेकर म्हणाले, समाजमनाच्या आरोग्याकरीता हे एकप्रकारचे औषध आहे. मनोजैविक व्याधींकरीता उपचार करणे, हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून सहज शक्य आहे. याचा परिणाम पर्यावरण, माणूस, समाजमनावर होतो. त्यामुळे सामुहिकरित्या हा आरोग्यवर्धक जपयज्ञ करण्यात येत आहे.
अंकुश काकडे म्हणाले, लोकांचे दु:ख, कष्ट, विवंचना दूर करणारे हे स्तोत्र आहे. हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव आढळतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरि मुस्तिकर, सुभाष कुलकर्णी, तेजसदादा तराणेकर, लोंढेकाका आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.