MPSC Exam | वडिलांनी विकलेल्या जमिनीचे सोनं करणारी 'तृप्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 06:02 PM2022-06-03T18:02:02+5:302022-06-03T18:27:49+5:30

जिद्दीच्या जोरावर तृप्ती झाली अधिकारी...!

daughter trupti bandal mpsc exam crack made the gold of the fathers land sold | MPSC Exam | वडिलांनी विकलेल्या जमिनीचे सोनं करणारी 'तृप्ती'

MPSC Exam | वडिलांनी विकलेल्या जमिनीचे सोनं करणारी 'तृप्ती'

googlenewsNext

- पांडुरंग मरगजे

धनकवडी (पुणे) : लेक म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा! तिचं कल्याण व्हावं यासाठी तो प्रसंगी काळ्या आईलाही विकण्यास मागेपुढे पहात नाही. परंतु त्याची लेक ही त्याचीच सावली असते आणि वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मग ती कोणत्याही परीक्षेचे अग्निदिव्य पार पाडते. भोर तालुक्यातील इंगवली गावचे शेतकरी मानसिंग बांदल यांनी आपली मुलगी तृप्ती बांदल (रा. धनकवडी) हीने अधिकारी बनावं म्हणून आपली जमीन विकली. वडिलांची स्वप्न पूर्ती करताना तृप्तीने एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवले असून नुकतीच त्यांची उपजिल्हा भूमी अभिलेखपदी नेमणूक झाली आहे.

नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये तृप्ती बांदल यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत उपजिल्हा भूमी अभिलेख पद प्राप्त केले. तृप्तीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तर माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालय भोर येथे झाले. कला शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले, तर अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथून इंग्रजी या विषयात उत्तम गुणांसह पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर तृप्ती यांनी कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला मात्र पुढील शिक्षण आर्थिक कारणाने घेता आले नाही.

त्या नंतर तृप्ती यांनी नोकरीचा मार्ग पत्करला, नोकरी आणि शिक्षण अशी तारेवरची कसरत करत जमवलेल्या आर्थिक पुंजीतून त्यांनी फर्गुसन महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता तृप्तीने यांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले.  दरम्यान मुलीची जिद्द आणि हुशारी पाहता आपल्या मुलीने अधिकारी व्हावे, अशी वडिल मानसिंग यांची तीव्र इच्छा होती परंतु तृप्ती यांना नोकरी सांभाळून अभ्यास करणे अवघड जात होते. याही स्थितीत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला.

परंतु २०१९ मध्ये केवळ काही गुणांनी त्यांचे तहसीलदार पद हुकले. परिस्थितीची निकड लक्षात घेऊन वडिलांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीला नोकरी सोडून पूर्ण वेळ अभ्यास करण्याची मुभा दिली. तृप्ती यांनी या संधीचे सोने केले. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून उपजिल्हा भूमी अभिलेख पद प्राप्त केले. भोर सारख्या ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातून अधिकारी बनणाऱ्या तृप्ती बांदल या भोर तालुक्यातून अधिकारी बनलेल्या पहिल्याच महिला आहेत.

मुलीच्या यशाबद्दल मत व्यक्त करताना वडील मानसिंग बादल म्हणाले, मुलगी तृप्तीसाठी संघर्ष हा पाचवीला पुजलेला होता. परंतु परिस्तितीचा कोणताही बाऊ न करता प्रत्येक प्रसंगाला व परीक्षेला सामोरे जाण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले म्हणूनच तृप्ती अधिकारी बनू शकली.

Web Title: daughter trupti bandal mpsc exam crack made the gold of the fathers land sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.