दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार
By admin | Published: October 17, 2015 01:07 AM2015-10-17T01:07:47+5:302015-10-17T01:07:47+5:30
भिवडी (ता. पुरंदर) मोकाशीवस्ती (बोरमळा) येथील पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला
नारायणपूर : भिवडी (ता. पुरंदर) मोकाशीवस्ती (बोरमळा) येथील पुरंदर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश मोकाशी यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. त्या वेळी रमेश मोकाशी यांची आई लीलाबाई दशरथ मोकाशी (वय ६७) यांनी चोरट्यांना विरोध केला असता मारहाणीत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
मोकाशी यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत, कानातील कुड्या व रोख वीस हजार रुपये असा ऐवज दरोडेखोरांनी पळविला. रमेश दशरथ मोकाशी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश मोकाशी यांचे घर भरवस्तीत आहे. घराच्या मागील शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य ठेवण्याच्या खोलीचा दरवाजा उघडून घराची खिडकी उचकटून चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. मात्र बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने चोरट्यांनी भिंतीवर चढून शेजारील देवघरात प्रवेश केला. त्याठिकाणी लीलाबाई एकट्या झोपल्या होत्या. चोरट्यांनी देवघरातील कपाटातील रोख रक्कम २० हजार आणि गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत, कानातील कुड्या हिसकावून घेतल्या. त्यानंतर बाहेरील खोलीत प्रवेश केला. त्याठिकाणी दोन कपाटे होती, तीही उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याची चावी नसल्याने चोरट्यांनी लीलाबाई यांच्याकडे चावीची मागणी केली असावी; पण त्या कपाटाच्या चाव्या रमेश मोकाशी (मुलाकडे) यांच्याकडे असल्याने त्यांनी ‘नाही’ असे सांगितले असावे. त्यानंतर चिडून जाऊन देवघरातील कपाटातील दोन ते अडीच फुटाचा कोयता काढून त्यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केले.
घटनेची माहिती मिळताच भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड आपल्या कर्मचाऱ्यांसह हजार झाले. तलाठी गणेश महाजन, ग्रामसेवक एन. डी. शिवरकर उपस्थित होते. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ११ वाजता घटनास्थळी हजर राहून परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
>> आर्थिक फसवणूक, सायबर गुन्ह्यांमध्येही जिल्ह्यात वाढ झाली. यापार्श्वभुमीवर ग्रामीण पोलिसांच्या वतीने जिल्हयात आजपासून जनजागृती मेळावे घेण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, गुन्हे वाढतच आहेत.
चड्डी व बनियान घातलेल्या सात ते आठ
दरोडेखोरांच्या टोळीने मरकळ (ता. खेड) येथील बाजारेवस्तीवर गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घातला. त्यात बाप लेकांना जखमी केली. ही घटना ताजी असतानाच पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे दरोड्याची घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच दिले आहे.
>>सासवड नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा निलीमा चौैगंडे यांच्या घरावरही आट महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. यात २८ तोळे सोनं चोरट्यांनी लुटले होते. यातील पाच आरोपींना पकड्यात पोलिसांना यश्इथा आले आहे. मात्र फक्त चार तोळे सोनेच त्यांच्याकडून मिळाले आहे.
>>फिंगर प्रिंट अधिकारी डी. आर. शेख यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणचे बोटांचे ठसे घेतले आहेत. सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४६० नुसार गुन्हा दाखल केला आहे.