उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यास दौंडच्या शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:22+5:302021-05-13T04:10:22+5:30
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हे पाणी या योजनेसाठी जाणार असल्याने नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत गोंधळ निर्माण झाला. यामुळे ...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हे पाणी या योजनेसाठी जाणार असल्याने नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत गोंधळ निर्माण झाला. यामुळे दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना भविष्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. मूळ आराखड्यानुसार पुणे महानगरपालिकेतून साडेअकरा टीएमसी पाणी बेबी कॅनालद्वारे दौंडकरांना देण्याचा करार आहे. परंतु प्रत्यक्षात तेवढे पाणी दौंडकरांना मिळत नाही. हे पाणी पाटस, वरवंडपर्यंत येते. तसेच मुळा-मुठा नदीद्वारे येणारे पाणी उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाल्याने नानगाव, कानगाव गावापर्यंत राहते. त्यामुळे दौंडचा पूर्व भाग हा सर्वस्वी उजनी धरण क्षेत्रावरती आहे. हा फुगवठा खोरवडी, देऊळगाव राजेपर्यंत आलेला आहे. इंदापूरकरांनी पाणी पळवल्यास दौंडकरावर अन्याय होईल. हजारो एकर शेती भविष्यामध्ये नापीक होण्याचा धोका आहे. आराखड्यामध्ये ११ टीएमसी पाणी दौंडकरांना मंजूर असताना त्यापैकी ५ टीएमसी पाणी इंदापूरकरांनी आपल्या नावे करून घेतले आहे. खडकवासल्याचे पाणी इंदापूरकरांनी तरंगवाडी तलावपर्यंत नेले व त्यानंतर शेतीसाठी वापर करण्यास सुरुवात केली.
खडकवासला प्रकल्प होताना तेथील शेतकर्यांचे पुनर्वसन दौंड तालुक्यामध्ये झालेले आहे. इंदापूरमध्ये एकाही शेतकर्यांचे पुनर्वसन झालेले नाही. भविष्यात शासनाने उजनी धरण क्षेत्रातील हे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेल्यास खडकवासला मुख्य कालव्यातून इंदापूरला जाणारे पाणी बंद करणे गरजेचे आहे. इंदापूरकरांचा दोन्ही बाजूने पाणी पळवण्याचा दौंडकर कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. तसेच हे पाणी पुणे महानगरपालिका किंवा अन्य तालुक्यांना ही वापरून देणार नाही. भविष्यात या पाण्याबाबत पळवापळवी झाल्यास झाल्यास या पाण्यासाठी दौंडकरांच्यावतीने जनआंदोलन उभारले जाईल, अशी माहिती महेश भागवत यांनी दिली.