दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 21:27 IST2023-06-20T20:43:57+5:302023-06-20T21:27:19+5:30
पती व्यवसायाने गुरांचा डॉक्टर तर पत्नी शिक्षिका म्हणून काम करत होती

दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले
वरवंड : वरवंड येथील चैताली पार्कमधील गंगासागर पार्कमध्ये कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले. मंगळवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांना एक चिठ्ठी मिळाली त्यावरून डॉक्टरने पत्नी व मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२), पत्नी पल्लवी (३५), मुलगा अद्वित (११), मुलगी वेदांतिका (७) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल दिवेकर हे जनावरांचे डॉक्टर आहेत तर त्यांची पत्नी पल्लवी या शिक्षिका आहेत. मंगळवारी दुपारी दिवेकर यांच्या बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना डॉ. अतुल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी पल्लवी खाली निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. यवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला तर मी स्वतः आत्महत्या करत असल्याचे डॉ. अतुल दिवेकर यांनी नमूद होते. पोलिसांनी चिठ्ठीत ज्या विहिरीचा उल्लेख केला होता. त्या ठिकाणी पाहणी करून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. कौटुंबीक वादातून हे कृत्य घडल्याचे बोलले जात असून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नाेंद करण्याचे काम सुरू होते.