दौंडमध्ये हातचलाखीने दुकानदाराला सव्वा लाखांना लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:57 PM2021-12-31T19:57:19+5:302021-12-31T19:57:33+5:30
दुकानाच्या गल्ल्यातील दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पहाण्याच्या बहाण्याने गल्यातील नोटा हातचलाखीने लंपास केल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
दौंड: दौंड येथील एका कापडाच्या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांना गंडा घातला असल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान चोरट्यांनी हातचलाखीने ही रक्कम लंपास केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दुकानाचे मॅनेजर पांडुरंग गुंड यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी चौकात भर रस्त्यावर असलेल्या एका स्टोअर्समध्ये दोन व्यक्ती आल्या त्यांनी दुकानदाराकडे मोजे मागितले. या दोन्ही व्यक्ती इंग्रजीतून बोलत होत्या. दुकानात आलेल्या दोन व्यक्तीपैकी एक व्यक्ती अंडरवेअर घेण्यासाठी दुसरीकडे गेला. दरम्यान मोजे घेतलेल्या व्यक्तीला पैसे परत देत असताना या माणसाने खिशातील पाकीट दोन वेळा गल्ल्यावर असलेल्या दुकानातील कामगाराच्या तोंडा समोर खालीवर केले. त्यानंतर ह्या व्यक्तीने दुकानाच्या गल्ल्यातील दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पहाण्याच्या बहाण्याने गल्यातील नोटा हातचलाखीने लंपास केल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेरबंद झाले असून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहे.