दौंडचे उपजिल्हा रुग्णालय असुरक्षित!
By Admin | Published: July 13, 2016 12:39 AM2016-07-13T00:39:55+5:302016-07-13T00:41:27+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व तळीरामांचा परिसरातील वावरामुळे दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाल परिसराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे
दौंड : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व तळीरामांचा परिसरातील वावरामुळे दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाल परिसराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. नुकतीच येथे काही व्यक्तींनी एका डॉक्टराला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे रात्र गस्तीची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
हे रुग्णालय शहराच्या निर्जन भागात आणि भीमा नदीपासून काही अंतरावर आहे. पथ दिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे सायंकाळ झाल्यावर येथे जाण्यासाठी रुग्ण घाबरतात. रुग्णालयाच्या बाजूलाच आरोग्य कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.
शनिवार (दि. ९) रोजी काही व्यक्तींनी रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचे कारण सांगत एका डॉक्टराला शिवीगाळ करून दमदाटी केली. सदर डॉक्टरने तुमचे रुग्ण आहेत का? असे विचारले, मात्र ते नसल्याचे समोर आले. तसेच काही महिन्यांपूर्वी एक मद्यपी गुन्हेगार रुग्णालयाच्या महिला प्रभागात गेला आणि तिथे रुग्ण महिलांचे फोटो काढत होता. त्याला कर्मचाऱ्यांनी बळजबरीने ओढून बाहेर काढले. तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी सेवाभावी आणि समाजिक संस्थांनी दूरदर्शन संच भेट दिले आहे. परंतु काही गुन्हेगार रुग्णालयात घुसले आणि त्यांनी दूरदर्शन संच फोडल्याची घटनाही गेल्या वर्षी घडली असल्याचे समजते.
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय गुन्हेगारीला वैतागून काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर, काही कर्मचारी निघून गेले आहेत. परिणामी, आरोग्य सेवेच्या काही जागा रिक्त आहेत. मात्र, उदासीन धोरणामुळे रुग्णालयाला सुरक्षारक्षक नाही. (वार्ताहर)