Daund Vidhan Sabha Election Result 2024 Live: दौंडला भाजपची हॅट्ट्रिक! सलग तिसऱ्यांदा राहुल कुल यांचा विजय, थोरात पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:17 PM2024-11-23T16:17:29+5:302024-11-23T16:17:52+5:30
Daund Assembly Election 2024 Result Live Updates:महाविकास आघाडी पराभूत उमेदवार रमेश थोरात यांची पराजयाची हॅट्ट्रिक झाली आहे
Daund Vidhan Sabha Election Result 2024 Live : दौंडला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी सलग तिसऱ्यांदा विजय होऊन हॅट्ट्रिक साधली आहे तर, महाविकास आघाडी पराभूत उमेदवार रमेश थोरात यांची पराजयाची हॅट्ट्रिक झाली आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणूक राहुल कुल यांनी ७४६ मतं घेऊन निसटता विजय मिळवला होता, दरम्यान या निवडणुकीत सुमारे १३ हजार ९०६ मतांची आघाडी घेऊन गेल्या निवडणुकीतील कमी मतांचे शल्य भरून काढण्यात राहुल कुल मतदारांच्या जोरावर यशस्वी झाले. लाडकी बहीण आणि आरोग्यदूत म्हणून केलेली कामे राहुल कुल यांना विजयासाठी जमेच्या बाजू ठरल्या. पाटस येथील सुरू झालेल्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या संदर्भात राहुल कुल यांच्यावर टीका होत होती, मात्र या टीकेवर मात करीत कुल यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. कारण विरोधकांनी भीमा पाटस कारखान्याला लक्ष केले होते.मात्र भीमा पाटस कारखान्या संदर्भातील विरोधकांची जादू चालली नाही. राहुल कुल यांना पहिल्याच टप्प्यात भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना तालुक्यात मतदारांशी संपर्क साधने सोपे झाले होते, दुसरीकडे भाजपाचे मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले याच बरोबरीने सर्व जाती धर्माचे योगदान नाकारून चालणार नाही. आणि याची प्रचिती मतपेटीतून दिसून आली.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना मात्र प्रचार यंत्रणेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह नेहमीप्रमाणे स्वतःचा आत्मविश्वास नडला. दरम्यान तुतारी चिन्ह मिळवण्याच्या धावपळीत थोरात यांचा जनसंपर्क कमी झाला होता. मात्र ऐनवेळेस तुतारी चिन्ह रमेश थोरात यांना दिल्या गेल्यामुळे पवारांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांसह काही प्रमाणात जनतेत नाराजी होती परिणामी ही नाराजी मतपेटीतून दिसून आली तसेच वयोमानानुसार माझी शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साद थोरातांनी जनतेला घातली होती, मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. भीमा पाटस कारखान्याची वाताहत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गुणगान यासह अन्य काही थोरातांचे मुद्दे या निवडणुकीत होते मात्र या मुद्द्यांचा फारसा फायदा निवडणुकीत झाला नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळावा
दौंड तालुक्याला लाल दिवा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून दौंडकरांची इच्छा आहे, वरवंड येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले होते तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्रीपद देतो. तेव्हा जनतेने फडणवीस यांचे आव्हान तालुक्यातील जनतेने स्वीकारून राहुल कुल यांना आमदार केले. आता देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देऊन शब्द पाळावा अशी जोरदार चर्चा नागरिकांत होती.