दौंडकरांना मिळणार रेल्वेचे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 AM2021-04-26T04:10:26+5:302021-04-26T04:10:26+5:30
कोविड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे हॉस्पिटल कमी पडत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून होत आहे. ...
कोविड-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे हॉस्पिटल कमी पडत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून होत आहे. पुणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने दौंड येथील रेल्वेचे रुग्णालय बंद असल्याबाबत दौंड शिवसेना पदाधिकारी यांनी लेखी निवेदन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले होते. निवेदन प्राप्त झाल्यानंतर डॉ.गोऱ्हे यांनी तत्काळ सोलापूर डीएमआर यांच्याशी पत्र व्यवहार केला. आणि दौंड रेल्वेचे इस्पितळ दौंड येथील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
त्यानुसार (दि.२३) रोजी रेल्वे प्रशासनाने विनंती मान्य करून हे हॉस्पिटल शासनास वापरण्यासाठी दिले. याबाबत काल दौंडचे तहसीलदार संजय पाटील आणि मंडल अधिकारी सुनील जाधव यांनी ताबा घेण्याचे पत्र प्राप्त झाले. हॉस्पिटल ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी डॉ.गोऱ्हे यांना दूरध्वनीवरून सांगितले.