दिवे घाट बनलाय ‘कचरा घाट’, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:33 AM2017-12-11T03:33:52+5:302017-12-11T03:33:59+5:30
दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.
जयवंत गंधाले/लोकमत न्यूज नेटवर्क
फुरसुुंगी : दिवे घाटात कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप बंद झालेले नाहीत. यापूर्वी अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे दिवे घाट हा कचरा घाट बनला आहे. त्यामुळे या घाटाचे सौंदर्य नष्ट होत आहे.
दिवे घाटात पूर्वीपासून अनेक ठिकाणी कचरा आहे. हा कचरा न उचलता आणखीन टाकण्यात येत आहे. त्यातच आता एक्स्पायरी झालेली औषधे, सुया, इंजेक्शन सिरींज, गोळ्या, सलाईन बाटल्या, पावडर, पट्ट्या, सिरप लिक्विडच्या बाटल्या व वैद्यकीयसाठी लागणारे सर्वच एक्स्पायर झालेले व वापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. तसेच ते पेटवून दिले जात आहे. असे साहित्य अर्धवट जळाल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खराब वास व धूर निर्माण होत आहे. त्यामुळे येथील वन्यजीव वनस्पती व जीवसंपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच येथे येणाºया पर्यटक व प्रवाशांचे या कचºयामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जवळच मस्तानी तलाव असून, हा कचरा पाऊस पडल्यावर पाण्यात जात आहे. त्यामुळे तेथील तलावदेखील दूषित होत आहे. या तलावातील पाणी शेतीला देण्यात येते. त्यामुळे शेतात प्रदूषित पाणी गेल्याने पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.
निवेदन देऊनही कारवाई नाही
याबाबत अन्न औषध विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून काहीच कारवाई करण्यात येत नाही. यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शादाब मुलाणी, ज्ञानेश्वर कामठे, अमित गुरव, आकाश खैरे, रूपेश बोबडे, मयूरेश जाधव, धीरज गायकवाड यांनी केली आहे.
महामार्गावर कचराच कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेगाव बुद्रुक : पुणे शहरालगतच्या अकरा गावांचा पुणे महापालिकेमध्ये नुकताच समावेश करण्यात आला. परंतु या नवीन गावात असणाºया समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, या बाबत महापालिकेत चर्चा सुरु आहे. नुकतीच पुणे महापालिकेचे सहायक आयुक्तांनी या गावांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. परंतु, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
कात्रज-देहू बाह्यवळण महामार्गावर जागोजागी कचºयाचे ढिगारे साठलेले आहेत. या कचºयामध्ये बाटल्या, कुजकी फळे, बारदाणे, जुने कपडे इत्यादींचा समावेश आहे. हा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुरामुळे वाहनचालकांना वाहने चालवणेही अवघड बनत आहे.
त्यामुळे कचरा पेटवू नये, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचराकुंडीत टाकला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे आपली जबाबदरी आहे असे समजून त्या जागेची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे.
- अरुण राजवाडे, अध्यक्ष,
भाजपा खडकवासला मतदारसंघ