पुण्यात एक दिवस आधीच विमाने ‘जमिनी'वर; प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 12:47 PM2020-10-24T12:47:45+5:302020-10-24T12:52:37+5:30
काही उड्डाणे रद्द, तर काहींच्या वेळापत्रकात बदल..
पुणे : धावपट्टीच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी पुणेविमानतळ सोमवार (दि. २६) पासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. पण विमान कंपन्यांनी एक दिवस आधीच विमान उड्डाणांच्या वेळापत्रक बदल केला आहे. रविवार (दि. २५) पासून बहुतेक विमानांचा वेळा बदलण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे काही विमान उड्डाणे रद्द करण्याबरोबरच वेळांमध्ये बदल, थेट विमानाऐवजी एक-दोन थांबे असे बदल करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे विमानतळ हे हवाई दलाचे आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाला विमान उड्डाणांबाबत मर्यादा येतात. हवाई दलाकडून २६ तारखेपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. हे काम पुढील वर्षभर सुरू राहणार असल्याने यावेळेतील विमानांना दिवसा नियोजित केले जाणार आहे. हा बदल २६ तारखेपासून होणे अपेक्षित असताना एक दिवस आधीच बहुतेक विमान कंपन्यांनी रात्रीची उड्डाणे रद्द केल्याचे दिसून येते. विमान कंपन्यांकडून अचानक हे बदल करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे विमानतळ रात्रीच्यावेळी बंद करण्याचा निर्णय काही दिवस आधीच झाला आहे. तरीही कंपन्यांकडून तिकीटे आरक्षित केली जात होती.
आता दोन-तीन दिवसांपासून अचानक प्रवाशांना विमाने रद्द झाल्याचे, वेळा बदलल्याचे संदेश येऊ लागले आहेत. काही ठिकाणची दिवसाची विमानेही रद्द करण्यात आली आहेत. पुणे ते जयपुर जाणारे विमान पुणे ते दिल्लीमार्गे जयपुर असे वळविण्यात आले आहे. अन्य काही ठिकाणांबाबत असे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले. दानिश सिद्दीकी यांना पुण्यातून दिल्ली मार्गे रांचीला जायचे होते. हे विमान नियोजित वेळापत्रकानुसार पहाटे होते. पण आता वेळ बदलून सायंकाळी करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य काही प्रवाशांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून नाराजीही व्यक्त केली आहे.
-------------
दिवाळीमध्ये गोव्याला जाण्यासाठी दि. १६ नोव्हेंबरची १४ तिकीटे आरक्षित केली होती. हे विमान दुपारी १२ वाजताचे असूनही रद्द करण्यात आले आहे. तसेच परतीच्या प्रवासाचे १९ नोव्हेंबरचे विमानही रद्द झाले. विमानतळ रात्री बंद राहणार असताना हे विमान का रद्द केले, हे समजले नाही. त्यामुळे आता अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.
- सुमतीलाल शहा, पुणे
------------
एका विमान कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार शनिवार व रविवारच्या दिल्ली उड्डाणांच्या वेळा
शनिवारी - रात्री ८.५५, मध्यरात्री १२.०५. ३.२०, पहाटे ५.२०
रविवारी - सकाळी ८.१५, १०.१०, दुपारी २.१०, २.२५, ३.१०
--------------------