दिवस दुर्घटनांचा; ५ जणांचा मृत्यू
By admin | Published: February 21, 2015 10:37 PM2015-02-21T22:37:58+5:302015-02-21T22:37:58+5:30
गोहे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेतील इ.६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या सानिया वाळकोळी या आदिवासी मुलीचा आज (ता.२१) अपघाती मृत्यू झाला.
डिंभे : गोहे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेतील इ.६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या सानिया वाळकोळी या आदिवासी मुलीचा आज (ता.२१) अपघाती मृत्यू झाला. नातेवाइकांसोबत घरी जाताना मोटारसायकलवरून पडून डोक्याला मार लागल्याने या मुलीचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी आहुपे, आसाणे, तेरूंगण, राजपूर व गोहे येथे इ.पहिलीपासून १०वी पर्यंत निवासी आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांतील आदिवासी मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्वयंपाकी, कामाठी, वाचमन, अधीक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणविस्तार अधिकारी इत्यादी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या असतात.
निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलामुलींवर देखभाल करण्यासाठी मुलांच्या वसतिगृहावर अधीक्षक तर मुलींच्या वसतिगृहावर स्त्री अधीक्षिकेची नेमणूक केलेली असते. शाळा प्रवेशावेळी ज्या पालकांची ओळख दिली आहे त्याच पालकांसोबत मुलांना घरी सोडण्याचा नियम आहे. परंतु अनेकदा असे न होता वसतिगृहावर देखभालीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करून इतर पालकांसोबतही मुलांना घरी सोडले जाते. गोहे (ता.आंबेगाव) येथील आश्रमशाळेतील काल घडलेल्या घटनेमध्येही मुलगी जवळच्या नातेवाइकासोबत वाल्मीकवाडी येथे असणाऱ्या आपल्या घरी निघाली होती. घोडेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालकाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने ही मुलगी रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने मरण पावली आहे. (वार्ताहर)
सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू
४इंदापूर : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील वृद्धेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. कलावती नामदेव दगडे (वय ८०) असे या वृद्धेचे नाव होते. शनिवारी (दि.२१) सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. त्यामुळे दगडे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पारवडीत ऊसतोडणी कामगार महिलेची आत्महत्या
४बारामती : पारवडी (ता. बारामती) येथील ऊसतोडणी कामगार महिलेने शनिवारी (दि.२१) दुपारी ३ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
४याबाबत त्यांचे नात्ोवाईक माणिकचंद्र गव्हाणे (रा.पुणेकर वस्ती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. सुनीता अदिनाथ माळी (वय २५, सध्या रा. पुणेकर वस्ती, पारवडी, मूळ रा.कुमशी, ता. जि. बीड) या महिलेने उसाच्या शेतालगत असलेल्या चंदनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह
शिरसगावकाटा : येळेवस्तीतील विहिरीत तरूण विवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे. दुपारी ३ पासून हा मृतदेह पाण्यात दिसून आला. मृत महिलेचे नाव सुनीता सोपान येळे (वय २२, मूळगाव हिंगेवाडी, ता. श्रीगोंदा) आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
नीरा डाव्या कालव्यात बालक वाहून गेला
४बारामती : बारामती शहरातून वाहत असलेल्या नीरा डावा कालव्यात बालक वाहून गेल्याची घटना तीन हत्ती चौकात शनिवारी (दि.२१) घडली.
४पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बालकाचे आजोबा दिवाणसिंग बुद्धिसिंग चितोडिया यांनी खबर दिली आहे. त्यानुसार जिकंदर चितोडीया (वय ६) हा बालक शनिवारी (दि.२१) सकाळी नीरा डावा कालव्यालगत खेळत होता. मात्र, खेळताना तोल जाऊन तो कालव्यातील पाण्यात पडून वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या बालकाचा शोध घेण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी देखील या शोधकार्यात सहभाग घेतला.