लक्ष्मीपूजनादिवशीच ‘शेवंती’ शेतकऱ्यांवर रुसली!
By Admin | Published: November 14, 2015 03:01 AM2015-11-14T03:01:18+5:302015-11-14T03:01:18+5:30
नवरात्र उत्सव, दसऱ्याला समाधानकारक भाव मिळाल्याने समाधानी असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवंती फुलांनी नाराजी केली.
भुलेश्वर : नवरात्र उत्सव, दसऱ्याला समाधानकारक भाव मिळाल्याने समाधानी असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवंती फुलांनी नाराजी केली. आदल्या दिवशी किलोला ७0 ते १00 रूपयांपर्यंत असलेला भाव २0 ते ३0 रूपये मिळाल्याने जिल्ह्यातील फुलउत्पादकांमध्ये नाराजी आहे.
गेले दोन महिने फूलबाजारात राजा शेवंती ही फुले अधिराज्य गाजवत होते.
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी राजा शेवंतीची लागवड केली होती. येथील हवामान, हलक्या प्रतीची पोषक जमीन, जेमतेम पाणी, या कारणांमुळे येथील राजा शेवंती फुले पुणे, मुंबई, नगर, इत्यादी बाजारपेठेत येथील फुलांना मोठी मागणी असते.
फुलांची तोडणी सहा महिन्यांत येते. काही शेतकऱ्यांची फुले तर ऐन बैलपोळा या उत्साहादिवशी बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात आली. त्यास बाजारभावही मिळाला. नवरात्र उत्सव, दसऱ्या दिवशी समाधानकारक बाजारभाव मिळाला. दीपावली सणाच्या काळात मात्र असा बाजारभाव मिळाला नसल्याची खंत राजा शेवंतीचे उत्पादक शेतकरी गणेश मुरलीधर यादव यांनी व्यक्त केली.
दीपावलीच्या सणामध्ये महत्त्वाच्या लक्ष्मीपूजना दिवशीच राजा शेवंती फुलांचे बाजारभाव पूर्णत: कोसळले. फुले दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत विकावी लागली. यामुळे फूल उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करत होते.