तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्याची झाली दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:44 AM2017-07-24T02:44:53+5:302017-07-24T02:44:53+5:30

तळेगाव- चाकण हा अत्यंत वर्दळीचा असलेला रस्ता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाहतूककोंडीमुळे सुधापूल ते तळेगाव स्टेशन या भागात

The day of Talegaon Dabhade-Chakan road | तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्याची झाली दैना

तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्याची झाली दैना

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : तळेगाव- चाकण हा अत्यंत वर्दळीचा असलेला रस्ता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाहतूककोंडीमुळे सुधापूल ते तळेगाव स्टेशन या भागात संध्याकाळी नेहमीच कासवगतीने वाहतूक सुरू असते. यामुळे वाहनचालकांचा इंधन खर्च वाढतो. वेळेचा अपव्यय होतो. पावसामुळे तळेगाव -चाकण रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
हा रस्ता चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी यासारख्या औद्योगिक भागांना जोडतो. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक नेहमीच व्यस्त असते. रस्त्याचे काम होऊन सहा महिन्यांचा देखील कालावधी उलटला नाही. तोवरच या रस्त्याची अवस्था विदारक झाली आहे. मोठमोठे खड्डे, त्यात असलेले गाळमिश्रित पाणी, भरधाव वेगात येणारी वाहने आणि खड्डे चुकविताना चालकांची होणारी कसरत हे दृश्य नेहमीचेच झाले आहे.
रस्त्याची चाळण झाल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. राज्य महामार्गाकडून वर्ग करून राष्ट्रीय महामार्गाकडे या रस्त्याला नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मार्गावरील विशेषत: तळेगाव नगर परिषद हद्दीतील रस्त्याची अवस्था केविलवाणी झाली आहे. हा रस्ता तळेगाव नगर परिषदेकडे देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. कारण राज्य महामार्ग मंडळाने उड्डाणपूल, चौपदरीकरण करण्याच्या गर्जना केल्या. प्रत्यक्षात वेगवान कृती मात्र शून्य असल्याचा आरोप आहे.
नगर परिषदेकडे रस्ता आला तर किमान रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती व निगा राखली जाईल. सहा महिन्यांपूर्वी इंद्रायणी महाविद्यालय ते शहा पेट्रोल पंप दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पण या मोठ्या रकमेचे काम मात्र कुठेच दिसत नाही. रस्त्यावर खड्डे पडले, नागरिकांची आरडा ओरड सुरू झाली की खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून किंवा ओबड धोबड काम करून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
डांबरीकरण करून बाजूने गटार होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. रस्त्याचेच विद्रूपीकरण होत आहे. त्यात गटार कुठून तयार होणार? एवढा निधी मंजूर होऊन काम काहीच दिसत नसल्याने निधी नेमका कुणाच्या खिशात गेला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.

तळेगावकरांना हवाय चांगला रस्ता
तळेगावमध्ये रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टेशन चौकात वाहतुकीचे सिग्नल आहेत. पण ते सुरू करण्यास अद्यापी मुहूर्त मिळाला नाही. वाहनचालकांना स्वयंशिस्त नाही. नियमांचे पालनही कोणीच करीत नाही. त्यामुळे वाहतूक नियमनयुक्त आणि खड्डेमुक्त रस्त्याच्या प्रतीक्षेत प्रत्येक तळेगावकर आहेत. प्रशासनाबरोबर सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन चांगल्या रस्त्यांसाठी प्रयत्न करायला हवे.

अपघाताचा वाढता धोका
वडगाव फाट्यावरून तळेगावकडे निघाल्यास लागणाऱ्या महाराजा हॉटेल चौकात भर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. वाहनचालक वाहने रस्त्याच्या खाली उतरवून मार्ग काढतात. स्टेशन चौकात भेगडे पाटील कॉम्प्लेक्सच्या समोर खड्ड्यांनी रस्त्याची चाळणी झालेली दिसून येते. प्रत्येक वाहनचालकास खड्डे सुरू होण्यापूर्वी थांबावे लागते, विचार करावा लागतो आणि मग खड्डे चुकविण्याचे कौशल्य वापरावे लागते. पुढे जनरल हॉस्पिटल समोर, प्रताप मेमोरियल हॉस्पिटल समोर रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूंनी खड्डे आढळतात.

Web Title: The day of Talegaon Dabhade-Chakan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.