Dayanand Kanakdande: समतावादी चळवळीतील कार्यकर्ते दयानंद कनकदंडे यांचे निधन
By नारायण बडगुजर | Updated: June 26, 2024 19:09 IST2024-06-26T19:08:59+5:302024-06-26T19:09:13+5:30
दयानंद यांच्या अचानक जाण्याने समतावादी चळवळील पदाधिकारी, कार्यकत्यांनी हळहळ व्यक्त केली.....

Dayanand Kanakdande: समतावादी चळवळीतील कार्यकर्ते दयानंद कनकदंडे यांचे निधन
पिंपरी : परिवर्तनवादी, समतावादी चळवळीतील कार्यकर्ते, संपादक, प्रकाशक असलेले दयानंद कनकदंडे यांचे मंगळवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. दयानंद यांच्या अचानक जाण्याने समतावादी चळवळील पदाधिकारी, कार्यकत्यांनी हळहळ व्यक्त केली.
पुणे येथील मैत्री प्रकाशनचे प्रमुख असलेले दयानंद कनकदंडे हे त्यांची पत्नी मोहिनी कारंडे यांच्यासह दिघी येथे एका हाउसिंग साेसायटीत वास्तव्यास होते. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात बुधवारी शवविच्छेदन करून दयानंद यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर भोसरी येथे अंत्यसंस्कार झाले. दयानंद यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले तसेच अनेक पुस्तकांचे प्रकाशन देखील केले. मैत्री प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ते समतावादी चळवळीत सक्रीय होते.
मुळचे चंद्रपूर येथील असलेल्या दयानंद यांनी युवा भारत या संघटनेत राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम केले. तसेच ते विविध समविचारी संघटनांमध्ये सक्रीय होते. पत्नी मोहिनी कारंडे यांच्यासोबत त्यांनी प्रकाशन व्यवसायात महत्त्वपूर्ण कार्य केले. हिंदी आणि इंग्रजी साहित्य मराठीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोरोना काळात आदिवासी, भटके, वंचित घटकांतील लोकांसाठी त्यांनी काम केले. या घटकांच्या व्यथा साहित्य रुपात याव्यात यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न होते.