कार्यकर्त्यांवरील दराऱ्याचे संपले ते दिवस

By admin | Published: July 26, 2015 01:42 AM2015-07-26T01:42:33+5:302015-07-26T01:42:33+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वीसारखी स्थिती राहिली नसून, नेत्यांचा दरारा कमी झाल्याचे अलिकडच्या काळात जाणवू लागले आहेत. अपेक्षापूर्तीची शाश्वती नसल्याने अनेकजण

The days of the crackdown on the volunteers ended | कार्यकर्त्यांवरील दराऱ्याचे संपले ते दिवस

कार्यकर्त्यांवरील दराऱ्याचे संपले ते दिवस

Next

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वीसारखी स्थिती राहिली नसून, नेत्यांचा दरारा कमी झाल्याचे अलिकडच्या काळात जाणवू लागले आहेत. अपेक्षापूर्तीची शाश्वती नसल्याने अनेकजण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.
कधी पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना हजर न राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात येणार म्हटले की, आवर्जून त्यांच्या कार्यक्रमांना हजर राहायचे. त्यांच्या मागे-पुढे वावरायचे. एखाद्या पदावर संधी मिळावी, आपण पक्षाचे काम करतो, हे भासविण्याचा अनेकांचा केविलवाणा प्रयत्न असायचा. पवार यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्त्यांची बैठक होत आहे.
यापूर्वी नेत्यांची आदरयुक्त भीती त्यांना होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षाच्या विरोधात काम केले. त्यानंतरही मनमानी पद्धतीने वागणाऱ्या कोणावरही कारवाई होऊ शकली नाही, हे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लक्षात घेतले आहे. त्यांचे धाडस वाढले असून, शहर दौऱ्यावर नेते आले, तरी पहिल्यासारखे वातावरण दिसून येत नाही. ना राहिला दरारा, ना राहिली भीती, ना अपेक्षा, अशी स्थिती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची बहुमतात सत्ता आहे. परंतु, राज्यात आणि केंद्रातील बदलाचा परिणाम महापालिकेच्या राजकारणावरही जाणवू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसवेक गटागटांत विभागले गेले आहेत. भाजपाच्या वाटेवरील काही जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नावापुरते आहेत. २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची चांगली स्थिती असेल का, याबद्दल अनेक जण सांशक आहेत. महत्त्वाकांक्षा बाळगून राजकारणात उतरलेल्यांना यापुढे राष्ट्रवादीत काही लाभ होईल, असे वाटत नाही. महापालिकेत सत्ता राहील की नाही, याची खात्री नसल्याने ते अन्य मार्ग शोधू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री पवार यापूर्वी तीन वेळा येऊन गेले. मागील महिन्यात त्यांनी आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. गेल्या तीन बैठकांच्या निमित्ताने त्यांचा मवाळपणा जाणवू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखादे पद मिळेल, पुढे संधी मिळेल, ही समीकरणे आता कार्यकर्त्यांनी बदलली आहेत. पद मिळेल, संधी मिळेल, या अपेक्षाच नाहीत, तर कोणाला घाबरायचे कारण नाही. पद आणि संधी पाहिजे, तर अन्य मार्ग उपलब्ध आहेत, अशी मनाची समजूत करून घेतलले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बिनधास्त झाले आहेत.
(प्रतिनिधी)

- प्रभागातील स्वीकृत सदस्यपदासाठी २१ आॅगस्टला निवडणूक घेतली जाणार आहे. सहा प्रभागांत १८ जागांकरिता ही निवडणूक होत आहे. १८ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. विषय समित्यांची निवडणूक असो की, स्वीकृत सदस्य निवड असो, इच्छुकांकडून अर्ज मागवायचे. पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील असेल, त्याला इच्छुक म्हणून त्याने अर्ज केलेला नसला, तरी ऐनवेळी त्याला संधी द्यायची. अर्ज मागविण्याचा केवळ फार्स करायचा, हे आता सामान्य कार्यकर्त्यांनाही कळून चुकले आहे. प्रभागाच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर नाराजांचा मोठा गट बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहे. त्याचा फटका पक्षाला बसणार आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत दिसून येणाऱ्या परिस्थितीतून पुढील काळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत मिळणार आहेत.

Web Title: The days of the crackdown on the volunteers ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.