लोणावळ्यातून जाणाऱ्या ‘हायवे’वर जड वाहनांना दिवसा बंदी; सकाळी ६ ते रात्री १० निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:22 PM2024-06-20T13:22:21+5:302024-06-20T13:24:21+5:30

लोणावळ्यात असंख्य पर्यटक येत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते, तसेच या वाहनांमुळे प्राणांतिक अपघात झाले आहेत

Daytime ban on heavy vehicles on the old pune mumbai highway passing through Lonavala 6 am to 10 pm restriction | लोणावळ्यातून जाणाऱ्या ‘हायवे’वर जड वाहनांना दिवसा बंदी; सकाळी ६ ते रात्री १० निर्बंध

लोणावळ्यातून जाणाऱ्या ‘हायवे’वर जड वाहनांना दिवसा बंदी; सकाळी ६ ते रात्री १० निर्बंध

लोणावळा : लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड व अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्येमुळे हा आदेश लागू करण्यात आला आहे. या वेळेत सर्व प्रकारची जड-अवजड वाहने मनशक्ती येथून द्रुतगती मार्गावर वळवण्यात येणार आहेत. खंडाळ्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.

लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार व सलग सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांची वर्दळ राष्ट्रीय महामार्गावरून होत असते. त्याच मार्गावर अवजड वाहने आल्याने वाहतूक कोंडी होते. या अवजड वाहनांमुळे लोणावळा शहरामध्ये अनेक प्राणांतिक अपघात झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणांतिक अपघातानंतर जागरूक नागरिकांच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीमध्ये अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र अवजड वाहनांची सुस्पष्ट व्याख्या नसल्याने अनेक जड वाहने तसेच मोठे कंटेनर नजर चुकवून लोणावळा शहरातून जाण्याचा प्रयत्न करत होती.

त्यामुळे लोणावळा पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्याची सुधारित मागणी केली होती. त्यानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. मनशक्ती केंद्र ते खंडाळा बॅटरी हिल यादरम्यान हा बंदी आदेश असणार आहे. मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दुतर्फा सर्व अवजड वाहने जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असल्याने त्या वाहन चालकांनी एक्स्प्रेस वेवरून प्रवास करावा, असे आदेशात म्हटले आहे. सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी यासाठी प्रयत्न केले.

आता अंमलबजावणी व्हावी!

लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे. ही कोंडी व अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी हा प्रवेशबंदीचा आदेश काढला आहे. त्याची कडक अंमलबजावणी पोलिस प्रशासनाने करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Daytime ban on heavy vehicles on the old pune mumbai highway passing through Lonavala 6 am to 10 pm restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.