पुण्यातील खडकमाळ आळीत भरदिवसा गोळीबार; फायरिंगमध्ये चोरटा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 02:47 PM2021-09-02T14:47:13+5:302021-09-02T21:02:09+5:30
चोरटा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे
पुणे : खडकमाळ आळी परिसरातील एका घरात शिरुन घरफोडी करणारा सराईत चोरटा आणि घरमालक तरुण या दोघात तब्बल १० मिनिटे धरपकडीचा थरार रंगला. यावेळी घरात शिरलेल्या चोरट्याने प्रतिकार करणार्या घरमालकावर पिस्तुलातून ३ गोळ्या झाडल्या. चोरट्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. तरीही घरमालकाने चोरट्याला पकडून ठेवले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन आरोपीला पकडले. खडक पोलिसांनी या आरोपीला अटक केली. त्याच्याबरोबर असलेली महिला साथीदार मात्र या गडबडीत पळून गेली.
विठ्ठल वामन भोळे (वय ४७, रा. हडपसर, मुळ जळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. आवेज सलीम अन्सारी (वय २३) असे घरमालकाचे नाव आहे.
आवेज अन्सारी यांचे बालाजीनगर येथे स्नॅक सेंटर आहे. ते दुपारी एकच्या सुमारास हिना टॉवरमधील दुसर्या मजल्यावरील घरी आले होते. ते रहात असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर नाष्टा करत असताना त्यांना खालच्या मजल्यावर गोंध सुरु असल्याचा आवाज आला. त्यामुळे ते तातडीने खाली आले. तेव्हा विठ्ठल भोळे व त्याची साथीदार महिला बॅगेत काहीतरी भरताना दिसले. त्यांच्या घरात यापूर्वी एकदा चोरी झाली असल्याने त्यांना लगेच चोरटे घरात शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी भोळे याला पकडले. मात्र, भोळेने प्रतिकार करीत त्याला ढकलून देत खिशातून पिस्तुल काढले. त्याही परिस्थितीत अन्सारी यांनी त्याला पकडून मान काखेत दाबून भरली. दुसर्या हाताने भिंतीवर त्याचा हात आदळला. त्यामुळे त्याच्या हातातील पिस्तुल पडले. दरम्यान, भोळे याने अन्सारी यांच्या हाताला कचकचून चावा घेऊन सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. गोळ्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे नागरिक धावत आले. ते अन्सारी यांच्या मदतीला जाऊन भोळे याला पकडून ठेवले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी भोळेला ताब्यात घेऊन पिस्तुल हस्तगत केले. या गडबडीत भोळे याच्याबरोबरील महिला कटावणी घेऊन पळून गेली.
जीवाची पर्वा न करताना पकडले; आवेज अन्सारी
मी दुपारी एकच्या सुमारास घरी आलो होतो. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर मी, आई व माझी पत्नी असे तिघे जण बसलो होतो. त्यावेळी पहिल्या मजल्यावर काही तरी गडबड असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मी खाली आलो. त्यावेळी एक महिला व पुरुष असे दोघे जण घरात चोरी करत होते. त्यांना मी पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात समोरील व्यक्तीने माझ्यावर पिस्तूल रोखले. आमच्या दोघांची झटापट सुरू झाली. त्याने माझ्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. तरी मी धाडस करत त्याला पकडले. त्याची मान मी माझ्या काखेत दाबली होती. मान सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने माझ्या हाताचा जोरात चावा घेतला. दहा मिनीटे आमच्या हा थरार सुरू होता. मी त्याला ढकलत खालच्या जिन्यापर्यंत आणले.त्यानंतर इतर नागरिकांच्या मदतीने त्याला आम्ही पकडून पोलिसांच्या हवाली केले. दुसर्या मजल्यावर आम्ही सर्वजण होतो. त्याला तेथेच मी थांबविण्याचा प्रयत्न केला नसता तर त्याने घरातील इतर लोकांना देखील मारण्याचा प्रयत्न केला असता, त्यामुळे मी माझ्या जीवाची पर्वा न करता चोरट्याचा प्रतिकार केला, असे आवेज अन्सारी यांनी सांगितले.
भोळेला जन्मठेपेची शिक्षा
भोळे हा नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, घरफोडी असे गुन्हे आहेत. कोवीडमुळे तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला आहे. तो दिवसाच घरफोडी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
......
खडकमाळ आळी परिसरातील हिना टॉवर इमारतीत चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. त्यावेळी तेथे गेलेल्या तरूणाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने गोळीबार केला. तसेच त्याच्या हाताचा चावा घेत जखमी केले. आरोपीविरूद्ध घरफोडीचे गुन्हे असून त्याच्याकडून पिस्तुल व काडतुस ताब्यात घेतले आहे.
श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे