Pune Crime: दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईताच्या सिंहगड रस्ता पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:03 AM2023-06-09T11:03:29+5:302023-06-09T11:07:55+5:30
आरोपीवर चाळीसहून अधिक गुन्हे दाखल...
धायरी (पुणे) : बंद फ्लॅटची रेकी करून घरफोडी करणारा सराईत चोरटा सिंहगड रस्ता पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मयुर ऊर्फ अमित ऊर्फ बंटी सोपान भुंडे (वय: ३६ वर्षे, रा. केळेवाडी, कोथरुड. सध्या राहणार : संभाजीनगर, धनकवडी पुणे) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. यातील आरोपींचा शोध सिंहगड रस्ता पोलीस करीत होते. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषन व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण,अविनाश कोंडे यांना घरफोडीतील आरोपी नऱ्हे परिसरातील सेल्फी पॉइंट परिसरात एका दुचाकीवर बसला असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण चार चोरीच्या गुन्ह्यातील दोन लाख पन्नास हजार किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्हा करताना वापरत असलेले २० हजार रुपयांचे वाहन त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, नलीन येरुणकर, संजय शिंदे, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.
चाळीसहून अधिक गुन्हे दाखल...
घरफोडी प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मयुर ऊर्फ अमित ऊर्फ बंटी सोपान भुंडे याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चाळीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत. अगोदर तो बंद घराची रेकी करीत असे, व त्यानंतर तो एकटाच घरफोडी करीत असल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात लवकर सापडत नव्हता. मात्र सिंहगड रस्ता पोलिसांनी विशेष तपास करून अखेर त्याला शोधून काढले.