Pune: शहरात दिवसाआड पाणी पुरवठा; पाणी कपात 'या' तारखेपर्यंत होणार, संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:37 PM2022-07-01T19:37:03+5:302022-07-01T21:55:38+5:30
पावसाने ओढ दिल्याने व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणी साठा अत्यंत कमी
पुणे : पावसाने ओढ दिल्याने व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधीलपाणी साठा अत्यंत कमी झाल्याने, अखेर महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता शहरात सोमवारपासून ( दि. ४) एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.
सदरचे नियोजन हे सोमवारपासून करण्यात येऊन ते सुरुवातीला आठ दिवसांसाठी म्हणजेच दिनांक ११ पर्यंत करण्यात येणार आहे. या दरम्यान पडणारा पाऊस व धरणांमधील पाणी साठा याचा विचार करुन, पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरु ठेवल्यास व पाऊस लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठयाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास व पर्यायाने धरणांमधील पाणी साठा योग्य प्रमाणात न वाढल्यास, पुणे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होऊ नये. यासाठी पुणे महानरपालिकेने पुणे शहरामध्ये एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे.
दिवसाआड पाणीपुरवठ्याचे टाईमटेबल पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर विभागनिहाय पाणीपुरवठा वितरणाचे नियोजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक ०४.०७.२०२२ पासून दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत सदर नमूद वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.