ससूनमध्ये अॅम्ब्युलन्सला जॅमर लावल्याने खोळंबला मृतदेह; नातेवाइकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:20 AM2018-12-13T03:20:03+5:302018-12-13T03:20:23+5:30
बेकायदेशीरपणे ५०० रुपये दंडाची वसुली
पुणे : ससून हॉस्पिटलच्या आवारातील शवागारासमोर उभ्या केलेल्या अॅम्बुलन्सला जॅमर लावल्याने ४ ते ५ तास मृतदेह खोळंबून राहिल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी घडला. ससून प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे जॅमर लावून दंडाची आकारणी केली जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
काळेवाडी येथे राहणाऱ्या स्वप्निल खाडे या २१ वर्षीय तरुणाचा मंगळवारी अपघातामध्ये मृत्यू झाला. ससूनमध्ये शवविच्छेदन करून तिथल्या शवागारात त्याचे पार्थिव ठेवण्यात आले होते. स्वप्निलचा भाऊ उत्कर्ष खाडे व त्याचे मित्र पार्थिव घेऊन जाण्यासाठी पंढरपूरहून अॅम्ब्युलन्स घेऊन बुधवारी पहाटे ३ वाजता ससून रुग्णालयात आले. पार्थिव ताब्यात देण्याची प्रक्रिया सकाळी केली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तिथेच अॅम्ब्युलन्स लावून ते प्रतीक्षा करीत थांबून राहिले होते.
सकाळी त्यांच्या अॅम्ब्युलन्सच्या चाकाला जॅमर लावण्यात आले. इथं बाहेरची अॅम्ब्युलन्स लावायची नाही, असे सांगून ५०० रुपये दंड भरण्यास स्वप्निलला सांगण्यात आले. ससूनच्या या नियमाची माहिती नव्हती. दंडाची रक्कम भरण्याइतके पैसेही आमच्याजवळ नाहीत, त्यामुळे जॅमर काढावा, अशी विनंती स्वप्निलने तिथल्या सुरक्षारक्षकांना केली. मात्र दंडाचे ५०० रुपये भरल्याशिवाय जॅमर काढला जाणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. तिथल्या वरिष्ठ डॉक्टरांना भेटून विनंती करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना डॉक्टरांना भेटू देण्यात आले नाही. त्याचबरोबर सुरक्षारक्षकांनी अत्यंत अरेरावीची भाषा वापरल्याचे स्वप्निल खाडे यांनी सांगितले.
मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी तो जॅमर लावलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये ठेवून दिला. सुरक्षारक्षक थोड्या वेळाने जॅमर काढतील अशी वाट त्यांनी पाहिली. मात्र कितीही विनवण्या केल्या तरी त्यांनी जॅमर काढला नाही. अखेर त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून सुरक्षारक्षकांना पाचशे रुपये आणून दिले व पावती देण्याची विनंती केली. मात्र, पावती मागितल्याने सुरक्षारक्षकांनी ते पाचशे रुपये घेतले नाहीत. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पैसे न घेताच जॅमर काढून टाकल्याचे खाडे यांनी सांगितले. रुग्णालयात अॅम्ब्युलन्स लावायची नाही तर कुठे लावायची, असा संतप्त प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
पोलिसांशिवाय दंडाचा अधिकार कोणालाच नाही
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालकांकडून दंड आकारण्याचा अधिकार केवळ प्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांना आहे.
त्यांच्याशिवाय इतर कोणालाही जॅमर लावून नागरिकांकडून दंड आकारता येत नाही.
ससून प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे दंडाची आकारणी केली जात असल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावती न देता रजिस्टरमध्ये नोंदणी
ससून रूग्णालयामध्ये वाहनांना जॅमर लावल्यानंतर दुचाकी चालकांकडून २०० रुपये तर चारचाकी चालकांकडून ४०० रुपये दंड आकारला जातो. सुरक्षारक्षक हा दंड घेतल्यानंंतर कोणतीही पावती देत नाहीत, त्याऐवजी त्यांच्याकडील रजिस्टरमध्ये वाहनाची नोंद करून घेतात, असे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.
समितीच्या निर्णयानुसार दंडाची आकारणी
ससून रुग्णालयाच्या समितीने वाहनांना जॅमर लावून दंडाची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दंडापोटी गोळा झालेली रक्कम शासनाकडे जमा केली जात आहे.
- अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय