उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आढळला महिलेचा धडावेगळा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 08:11 PM2018-05-05T20:11:29+5:302018-05-05T20:11:29+5:30
हात, पाय, मुंडके धारदार शस्त्राने वेगळे करून धड साडीत गुंडाळून फेकून दिल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.
भिगवण : उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात भिगवण गावच्या परिसरात अंदाजे २० ते २५ वर्षांच्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. हात, पाय, मुंडके धारदार शस्त्राने वेगळे करून धड साडीत गुंडाळून फेकून दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आला आहे. अत्यंत वाईट अवस्थेत असणाऱ्या धडाची ओळख पटविण्याचे कठीण आव्हान भिगवण पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
शनिवारी (दि. ५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिगवण-राशिन रोडवरील जुने गावठाण येथील पुलालगत मासेमारी करण्यासाठी मोहन शिंदे व दत्तू शिंदे दोघे भाऊ गेले असता त्यांना ओढ्याच्या किनाऱ्यालगत साडीत गुंडाळून टाकलेले धड आढळून आले. देहाची जवळून पाहणी केली असता धारदार शस्त्राने कमरेच्याखालील भाग, मुंडके, दंडापासून हात तोडून टाकल्याचे आढळून आल्याने शिंदे यांनी भिगवण पोलिसांना कळविले. मिळालेल्या माहितीच्या आधारे भिगवण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी जाऊन धड ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच बारामती विभागाचे पोलीस बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत दत्तात्रय शिंदे (रा. भिगवण स्टेशन, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गाव असल्यामुळे इतर ठिकाणी खून करून मृतदेह टाकण्याचा प्रकार मदनवाडी गावच्या हद्दीत काही वर्षांआड घडला होता. त्याचा तपास पोलिसांनी लावत गुन्हेगारांना गजाआड केले होते. परंतु, या गुन्ह्यात फक्त वाईट अवस्थेत असलेल्या धड आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटवून गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या गुन्ह्याचा तपास विभागीय अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एन. एम. राठोड करीत आहेत.