दौंड येथे आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:33 PM2018-06-12T17:33:57+5:302018-06-12T19:27:27+5:30
मृतदेहाजवळ रिकामे कॅन आढळून आल्याने रॉकेल किंवा पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
पुणे: दौंड : दौंड येथील रेल्वे यार्ड परिसरात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरचा प्रकार हा घातपाताचा असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरी रेल्वे पोलिसांनी मात्र याबाबत आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या शवविच्छेदनानंतर वस्तुस्थिती पुढे येणार असल्याने नेमका हा प्रकार कशातून घडला याचा उलघडा होईल. साधारणत: या तरुणीचे वय पंचवीसच्या जवळपास असून सदर तरुणी १00 टक्के भाजलेली होती. घटनास्थळी रेल्वेचे पोलीस निरीक्षक देवसिंह बाविस्कर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी या तरुणीचा मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
जुन्या एसटी स्टॅण्ड येथून पोस्ट आॅफिसजवळ रेल्वे यार्डात जाण्यासाठी रस्ता आहे. या यार्डात रेल्वेचे डबे उभे असतात. एकंदरीत हा परिसर निर्जनस्थळी असून याच ठिकाणी सदरच्या तरुणीचा मृतदेह सकाळी आढळून आला. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने गुन्हेगारांचे नेहमीच फावले जाते. यापूर्वीही देखील या परिसरात गुन्हेगारी घडलेली आहे. रेल्वे फलाटवरुन चोºया करुन पळाल्यानंतर चोरटे रेल्वे यार्डजवळ असलेल्या प्रवाशी बोग्यांमध्ये लपतात यातील एक प्रवाशी बोगी गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडून आहे. या बोगीचा वापर देखील यापूर्वी गुन्हेगारीसाठी होत असल्याचे लोकमतने सचित्रवृत्त प्रसिद्ध केले आहे.