मुळा-मुठा नदी पात्रात मृत माशांचा खच; नायडू मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी प्रक्रियेविना नदीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:20 IST2024-12-23T09:20:32+5:302024-12-23T09:20:44+5:30
महापालिका किंवा राज्य शासनाकडून पर्यावरण कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यंत्रणा नाही

मुळा-मुठा नदी पात्रात मृत माशांचा खच; नायडू मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी प्रक्रियेविना नदीत
लष्कर : पुण्यातील महत्त्वाच्या मुळा-मुठा नदी पात्रात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील नाईक बेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला. नायडू मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी आणि नदी सुधारणेच्या नावाखाली नदीचा कमी झालेले पात्र याला जबाबदार असल्याची माहिती कांची वस्तीतील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.
मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मृत जलचर प्राणी आणि माशांच्या खच साचला आहे. पाण्याच्या प्रदुषणासह पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर कारणे समोर आली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून पर्यावरणाचा रक्षण करण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार अतिशय उदासीन असल्याचे दिसत आहे.
मैला पाणी थेट नदीत महापालिकेने नायडू रुग्णालयाजवळ मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प पंपिंग स्टेशन सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी उभारला आहे. मात्र, या पाण्यावर प्रक्रिया न करता पाणी थेट नाल्यामार्फत मुळा-मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील जलचरांसह माशांचा मृत्यू होत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे रविवारी पाण्यावर मोठ्या प्रमाणात साचलेले मृत माशांचा खच हा होय.
नदी सुधारणा प्रकल्प सदोष
केंद्र शासनाचा नदी सुधारणा प्रकल्पाच्या नावावर मुळा-मुठा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे. सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली नदीचे दोन्ही बाजूचे पात्र हे अरुंद झाले आहे. नदी खोलवर खोदली नसल्याने मोठ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीला पूर येऊन हे पाणी नागरिकांच्या घरात शिरते.
प्रशासनाचे सततचे दुर्लक्ष
पुण्याचे नैसर्गिक सौंदर्य कथाकथित प्रगतीच्या नावावर कमी होत चालले आहे. महापालिका किंवा राज्य शासनाकडून पर्यावरण कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यंत्रणा नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
महापालिकेच्या नायडू पंपिंग स्टेशनचे दूषित पाणी प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. राज्य शासन किंवा महापालिकेचे याकडे लक्ष नाही. पावसाळ्यात देखील पुराचे पाणी आमच्या घरात येते. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. - शैलेश कांची, स्थानिक नागरिक