मुदतींवर मुदत... सामान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:32 IST2025-02-01T18:31:29+5:302025-02-01T18:32:13+5:30
पाणीपुरवठाच्या कामाला तीनदा मुदतवाढ देऊनही कामे कासवगतीने

मुदतींवर मुदत... सामान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती नाही
- हिरा सरवदे
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला महापालिकेने दिलेली तिसरी मुदतवाढ संपत आली तरीही अद्याप २० टक्के कामे बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा चौथ्यांदा कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून, त्याला आयुक्तांची मान्यता घेतली जाणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी मंजूर केलेल्या २४३५ कोटींच्या निधीपैकी १४१७ निधी खर्च झाल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि पुणेकरांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेला महापालिकेच्या मुख्य सभेने मे २०१५ मध्ये मंजुरी दिली आहे. त्यानंतर २४३५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या.
योजनेसाठी नेमलेल्या प्रकल्प सल्लागाराने दिलेल्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर बसवणे, नागरी सुविधा केंद्र ७ आणि ५ नवीन पम्पिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निविदेत नमूद केले होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे आजवर तीन वेळा या कामांना मुदतवाढ देण्यात आल्या आहेत.
तिसरी मुदतवाढ आता फेब्रुवारीमध्ये संपत आहे, तरीही योजनेची कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप वीस ते पंचवीस टक्के कामे बाकी आहेत. त्यामुळे चौथ्यांदा मुदतवाढ घेण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणी मीटर बसविण्यास विरोध
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविले जात आहेत. मीटर बसविल्यानंतर पाण्याची चोरी पकडली जाणार, जास्त पाणीबिल येणार या भीतीने मीटर बसविण्यास नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून विरोध होतो. त्यामुळे योजनेतील इतर कामांच्या तुलनेत पाणी मीटर बसविण्याचे काम उपेक्षित उद्दिष्ट गाठू शकले नाही.
अनेक पाणी मीटरची मोडतोड
योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीबिल आकारले जाणार आहे. त्यामुळे बसविलेले मीटर संध्या तरी धूळ खात बंद अवस्थेत आहेत. त्यातच मीटर बसविण्यास विरोध, त्यामुळे बसविलेल्या अनेक मीटरची मोडतोड झाल्याचे चित्र पहायला मिळते.
अद्याप २० टाक्यांची कामे प्रलंबित
योजनेंतर्गत एकूण ८६ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. यापैकी ६६ टाक्यांची कामे झालेली आहेत. यातील १३ टाक्यांची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. जागा नसल्याने ५ टाक्यांची ठिकाणे बदलल्याने कामे रखडली आहेत. तसेच अद्याप दोन टाक्यांना जागाच उपलब्ध झालेली नाहीत, तर एका टाकीचे काम न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे.
प्रकल्पास विलंब होण्याची कारणे
- पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा व नेत्यांचा विरोध
- जलवाहिन्यांच्या खोदाईकरिता वाहतूक पोलिस, राष्ट्रीय महामार्ग, वनविभाग, संरक्षण विभाग आदींकडून परवानग्या मिळत नाहीत.
- दाट वस्ती भागात काम करण्यास येणाऱ्या विविध अडचणी.
- खोदाईसाठी विविध सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्यास येणाऱ्या अडचणी.
डिसेंबर २०२४ पर्यंत झालेली कामे :
- वितरण जलवाहिन्या : १२२४ पैकी ९६७ किमी
- टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या : १०१ पैकी ९२.१९ किमी.
- पाणी मीटर : २ लाख ३२ हजार २८८ पैकी १ लाख ६८ हजार ७२२
- पाणी साठवण टाक्या : ८६ पैकी ६६
- नागरी सुविधा केंद्र : ः७ पैकी ५
- पंपिंग स्टेशन : ५ पैकी ४ ठिकाणची कामे सुरू आहेत.
- आत्तापर्यंत २ हजार ४३५ कोटी पैकी १ हजार ४१७ कोटी रुपये खर्च