राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:25+5:302021-09-17T04:14:25+5:30
बारामती: राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ...
बारामती: राष्ट्रीय परवान्यावरील वाहनांच्या नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालय सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी २०२० पासून अनुज्ञाप्ती, परवाना व योग्यता प्रमाणपत्र मुदत संपुष्टात आली असल्यास. लॉकडाऊनमुळे नूतनीकरण होऊ शकले नसल्यास त्यास ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये ॲथोरायझेशनचा उल्लेख नसल्याने क्षेत्रीय स्तरावर व सीमा तपासणी नाक्यावर अंमलबजावणी करताना अडचणी येत आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ८७ मध्ये प्राधिकार पत्राबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. उक्त नियमाच्या ८७(२)(३) नुसार राष्ट्रीय परवान्यावर चालणाऱ्या वाहनांकरिता एका वर्षाच्या प्राधिकार पत्राचे शुल्क १६५००/- भरणे आवश्यक आहे आणि ते एक वर्षाकरिता वैध असते. केंद्र शासनाने २४ मार्च २०२० पासून लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वैधता संपुष्टात आलेल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र / परवाना / वाहन नोंदणी कागदपत्रांची ,चालक अनुज्ञाप्तीची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्राधिकार पत्राबाबत मुदत वाढ देण्यात आलेली नाही.
काेरोनाचे पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टप्प्याटप्पाने १ फेब्रवारी २०२० पासून मुदत संपुष्टात आलेल्या अनुज्ञाप्ती, तसेच परवाना तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण जे कोविड-१९ चे परिस्थितीमुळे नूतनीकरण करता येऊ शकलेले नाही त्यास प्रथम ३०जून, ३० सप्टेंबर ,३१ डिसेंबर २०२० व यापुढे ३१मार्च, ३० जून तसेच आता ३० जूनपर्यंत संबंधित कागदपत्रे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, त्यामध्ये ॲथोरायझेशनचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच -ॲथोरायझेशन फी ही बॅंकेतून ऑनलाईन भरणा करता येऊ शकते, या पार्श्वभूमीवर भरण्यासाठी शासनाने कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही,असे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित कामकाज ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शासकीय सुटीच्या दिवशी देखील संबंधित कामकाज आरटीओ कार्यालय पूर्ण करणार आहे. त्यासाठी प्रतिदिन १५० जणांना अपॉईंटमेंट्स देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.