पुणेकरांना जीवघेणा श्वास; हवेने धोकादायक पातळी ओलांडली, मास्क वापरणे अत्यंत आवश्यक
By श्रीकिशन काळे | Published: November 2, 2023 03:13 PM2023-11-02T15:13:35+5:302023-11-02T15:14:49+5:30
खोकला, ताप, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आदी त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे
पुणे: शहरातील हवा प्रचंड प्रदूषित झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील हवा धोकादायक पातळीच्या वर गेली आहे. त्यामुळे खोकला, ताप, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे आदी त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. थंडीत हवेची गुणवत्ता ढासळते आणि म्हणून नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. मास्क वापरावे, असेही आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील हवेमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. सध्या वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढल्याने त्यातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बांधकामांच्या धुळीनेही प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पुणेकरांना प्रदूषित हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. शहरात सरासरी सूक्ष्म (पार्टिक्युलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म (पीएम २.५) धुलीकणाची पातळी वाईट आणि अतिवाईट दर्जापर्यंत गेलेली आहे. हवेत मिसळणारे धुलीकण हे थंडीमध्ये आकाशाच्या दिशेने वर जात नाहीत, परिणामी हिवाळ्यामध्ये हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते.
...म्हणून हवा प्रदूषित होते
हिवाळ्यामध्ये हवेत गारठा असतो. त्यामुळे हवा स्थिर असते. हवेमध्ये जे धुलीकण येतात, ते आकाशात किंवा जमिनीवर पडत नाहीत. ते हवेतच तरंगतात आणि म्हणून हवा प्रदूषित होते. उन्हाळ्यात या उलट होते की, जमिनीवरील हवा तापते आणि ती हलकी होते. त्यामुळे धुलीकण आकाशाकडे जातात.
अस्थमा रुग्णांनी काळजी घ्या
हवा प्रदूषित असेल तर श्वसनाचे आजार, हृदयरोग, स्ट्रोक, सर्दी, घसा खवखवणे, फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो. ज्या रूग्णांना अस्थमा आहे, त्यांनी तर अतिशय काळजी घ्यायला हवी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी कायम या थंडीमध्ये योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.
हवेची गुणवत्ता !
0 ते 50 - हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे, आणि वायू प्रदूषणामुळे कोणताही धोका नाही.
51 ते 100 - हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे. पण काही लोकांसाठी धोका असू शकतो.
101 ते 150 - आरोग्यासाठी संवेदनशील लोकांवर परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका.
151 ते 200 - लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सुदृढ नागरिकांनाही यामुळे धोका.
201 ते 300 व जास्त - सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढतो. प्रत्येकजण प्रभावित होऊ शकतो.
उपाय काय ?
- शक्यतो घराबाहेर पडू नका. पडलात तर मास्क जरूर वापरा.
- खिडक्या, दारे बंद ठेवून घरातील वातावरण शुध्द ठेवा
- घरामध्ये एअर प्युरीफायर लावू शकता
- आजुबाजूला झाडांची संख्या मुबलक ठेवा
हवेतील गुणवत्तेची पातळी
शिवाजीनगर : २३२
हडपसर : १६३
कोथरूड : १५६
लोहगाव : १४५
कात्रज : १०२
पाषाण : ९२
हवेची पातळी धोकादायक असेल तर त्याने सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डोकेदुखी, घसा खवखवणे, डोळे जळजळणे, ज्यांना अस्थमा आहे त्यांना अधिक त्रास होतो. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना चांगल्या प्रकारचा मास्क घालणे आवश्यक आहे. - स्वप्नील कुलकर्णी, फुप्फुसरोग तज्ज्ञ