जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:00 IST2025-01-11T10:59:39+5:302025-01-11T11:00:23+5:30
धोकादायक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर २०१७ पासून बंदी असूनही नायलॉन मांजा शहरात सर्रास विकला जातोय

जीवघेणा खेळ थांबवणार; नायलॉन मांजा उत्पादक अन् मुख्य डीलरवर पोलीस कारवाई करणार
पुणे : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग माेठ्या प्रमाणावर उडविले जातात. यात लहान-माेठे सर्वच सहभागी हाेत असतात. कुणाच्या आनंदात, कुणाचा बळी जाता कामा नये, म्हणून ठाेस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, शहरात नायलॉन मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. याच नायलॉन मांजामुळे कोंढवा बुद्रुक परिसरात दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही या धारदार मांजामुळे अनेक नागरिक जखमी होण्यासह काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात या मांजाची विक्री होत असल्याचे पुणेपोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे.
मांजाने गळा चिरणे, अशा प्रकारावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, आता नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांसह या मांजाची विक्री करणारे मुख्य डीलर आणि उत्पादक यांच्यावरदेखील थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दरवर्षी हा नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. दरवेळी कारवाईत केवळ मांजा विक्रेता लहान दुकानदार अडकताे. परंतु, नायलॉन मांजाचा डीलर आणि या मांजाचे उत्पादन करणारेदेखील याला कारणीभूत असल्याने त्यांच्यावरदेखील केली जाणार आहे.
तक्रार न दाखल झालेल्या घटनाही अनेक
धोकादायक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर २०१७ पासून बंदी आहे. तरीही बारीक काचेचा लेप असलेला मांजा शहरात सर्रास विकला जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये ७ गुन्हे दाखल केले आहे. २०२४ मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत, तर पाचजणांना अटक केली होती. शहरात अशा असंख्य घटना घडल्या आहेत. तक्रारी न दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
पतंग काटा काटीच्या स्पर्धेत मांजा येतोय बाजारात...
शहरात प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासूच खऱ्या अर्थाने असा नायलॉन मांजा विक्रीला सुरुवात होते. चोरट्या पद्धतीने हा नायलॉन मांजा बाजारात पुरविला जातो. हा मांजा पतंग उडविण्यासाठी व त्यातून आनंद घेण्यासाठी नाही तर आकाशात उडणारे अन्य पतंग कापण्यासाठी वापरला जातो. या काटाकाटीच्या स्पर्धेमुळेच हा नायलॉन मांजा बाजारात येत असल्याचे जाणकार सांगतात.
मकरसंक्रांती सणानिमित्ताने पतंग उडविताना नायलाॅन मांजाचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेल्या या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. याचा सर्वाधिक त्रास पक्षांना होतो. या पार्श्वभूमीवर चोरून नायलॉन मांजाची विक्री करणारे, मांजाचे डीलर आणि उत्पादक यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर