पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांचा जीवघेणा थरार; अपघाताचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:33 AM2022-11-11T11:33:14+5:302022-11-11T11:33:55+5:30
लघु वाहनधारकांसाठी ही अवजड वाहन यमदुताचा काळ ठरत आहेत...
- प्रसाद कुटे
कामशेत (पुणे) :पुणे- मुंबई या महत्त्वाच्या दोन शहरांमधील दुवा असलेल्या जुना पुणे- मुंबई महामार्ग व द्रुतगती महामार्गावर जय- वीरू व अमर- अकबर- अँथनी यांच्यातील वर्षानुवर्ष सुरू असलेली हार- जितची स्पर्धा काही थांबण्याचे नाव घेत नाही. लघु वाहनधारकांसाठी ही अवजड वाहन यमदुताचा काळ ठरत आहेत.
काही महिन्यांपूर्वी घडलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर या भयावह स्थितीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या नेत्याचा काही निभाव लागला नाही तिथे अपघातग्रस्त सामान्य नागरिकांचे काय हाल होतात हे न सांगितलेलेच बरे. दोन अथवा तीन लेन असणाऱ्या या महामार्गांवर अवजड वाहने एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात अक्षरश: नियमांची पायमल्ली करत सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. चारचाकी वाहन चालकांसह दुचाकीचालकांना यामुळे महामार्गावर प्रवास करताना एखाद्या युद्धात सहभागी होऊन जसे जीवाच्या आकांताने लढावे लागते, अशीच काहीशी परिस्थिती होते.
मुंबई येथील पोर्ट बंदरांवरून पुणे शहर व परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये लागणारा माल अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे आणला जातो. या वाहनचालकांना इच्छितस्थळी लवकरात लवकर वाहन घेऊन गेल्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांकडून बक्षिसे मिळतात. त्यासोबतच दोन वाहनांतील इर्षा व स्पर्धा हे विचित्र पद्धतीने गाडी चालवण्यास भाग पाडते. या इर्षेपोटी पुढे वाहनाचा ताबा सुटून अनेकदा दुचाकी व लघु चारचाकीधारक अक्षरश: अपघातात चिरडले जात असल्याने द्रुतगती महामार्ग व जुन्या पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर सध्या अवजड वाहनांची दहशत आहे.