बधिर पोलीस : हातवाऱ्यांच्या भाषेला समजले चिथावणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:45 AM2019-02-26T00:45:10+5:302019-02-26T00:45:13+5:30
समाजकल्याण कार्यालयासमोर कर्णबधिर विद्यार्थ्यांवर लाठीमार : सर्व स्तरांतून पोलिसांबाबत संताप
पुणे : कर्णबधिर आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या नेत्यांकडून हातवाऱ्यांच्या भाषेद्वारे दिल्या जाणाºया सूचनांना पोलिसांनी चिथावणी समजल्यानेच लाठीमाराचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत, आदेश कोणत्या अधिकाºयाने दिले, कर्णबधिर विद्यार्थी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्णबधिर विद्यार्थ्यांनी केवळ ‘ठिय्या आंदोलना’ची परवानगी घेतली होती. मोर्चाची परवानगी नव्हती, असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे; परंतु तरीही कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून का सांगितले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यामध्ये दहा ते बारा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू होते.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माफक लाठीचार्ज केल्याचा पोलिसांचा दावा
आंदोलक कर्णबधिर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालय याठिकाणी मोर्चा काढला होता. साधारण हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांचा तो जमाव होता. मुळातच त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधावा हे पोलीस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह होते. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांमधील एक नेता भिंतीवर चढला. त्याने सांकेतिक भाषेत आपल्या इतर सहकाºयांना येण्यास खुणावले. त्यामुळे ज्याठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते, ते पाडून त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या अंगावर बॅरिकेड पडले. काही ठिकाणी पोलीस खाली पडले. विद्यार्थ्यांना रोखण्याकरिता पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग न झाल्याने त्यांना बळाचा उपयोग करावा लागला. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये याकरिता माफक प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून, या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. नोकºया आणि शिक्षण याबाबत येणाºया अडचणी सोडविण्यासाठी राज्यभरातून कर्णबधिर आंदोलक जमले होते. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते मुंबईपर्यंत जाणार होते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करीत होते. त्यांच्या भावना समजावून घेऊन प्रकरण हाताळण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्र्रकाराचा निषेध करावा तितका थोडा आहे.
- मोहन जोशी, माजी आमदार